माध्यान्ह आहारातील उकळती आमटी अंगावर पडून 3 मुली गंभीर जखमी होण्याची जी घटना गोल्याळी (ता. खानापूर) येथे घडली त्या घटनेची सखोल चौकशी करावी तसेच जखमी मुलींच्या उपचाराचा खर्च सरकारने उचलावा, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन आणि सामाजिक संस्था बेळगाव यांनी केली आहे.
भ्रष्टाचार निर्मूलन आणि सामाजिक संस्था बेळगाव यांच्यावतीने सदर मागणीचे निवेदन गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी एस. बी. बोमनहळळी यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे जखमी मुलींच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत करण्याचे आदेश सीडीपीओ यांना दिले. गोल्याळी (ता. खानापूर) येथे माध्यान आहार योजनेअंतर्गत तीन मुली भाजून जखमी होण्याची जी घटना घडली त्या घटनेची सखोल चौकशी तर करावीच शिवाय त्या मुलींचा उपचाराचा खर्च सरकारने उचलावा. त्याचप्रमाणे संबंधित मुलींच्या गरीब कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
भ्रष्टाचार निर्मूलन आणि सामाजिक संस्था बेळगावचे अध्यक्ष शिवाजी कागणीकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात नामदेव मोरे, पवन देसाई, नंदकुमार नागोरी, राहुल पाटील आदींचा समावेश होता.
उकळती आमटी अंगावर पडून संजना शिवाजी कॉलम (वय 4 वर्षे), सानवी शिवाजी कॉलम (वय 4 वर्षे) आणि समीक्षा गोविंद कॉलम (वय 4 वर्षे, सर्व रा. गोल्याळी) या एकाच घरातील तीन लहान मुलींना भाजले आहे.
तिघांच्याही पायाला व कमरेखालील भागाला इजा झाली आहे. सध्या जिल्हा इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान एका 70 वर्षीय अंगणवाडी सेविकेच्या हातातून ही दुर्घटना घडल्यामुळे वयोवृद्ध महिलांची माध्यान्ह आहार सेविका म्हणून नियुक्ती करू नये अशी मागणी संतप्त गोल्याळी ग्रामस्थांनी केली आहे.