महाराष्ट्रातील कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या शपथ विधीचा अखेर जय सीमा भागासह संयुक्त महाराष्ट्र! या घोषणेने केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सीमा प्रश्नाला अग्रक्रम मिळाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज सोमवारी संपन्न झाला. विस्तारित मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी सोमवारी विधान भवनामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी आपल्या पद आणि गोपनीयतेच्या शपथेची अखेर जय सीमा भागासह संयुक्त महाराष्ट्र! या घोषणेने केली.
अनेक जण आई-वडील, देश,धरती माता, तिरंगा वगैरेंना स्मरून शपथ घेत आहेत आमदार हसन मुश्रीफ यांनी मात्र बेळगावच्या सीमा प्रश्नाला स्थान देत शपथ घेतली. आपल्या शपथेद्वारे महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळणारे हसन मुश्रीफ यांनी देखील सीमाप्रश्नाशी असलेली आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. यापूर्वी चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी सीमाभागात खितपत पडलेल्या मराठी भाषिक सीमावासियांना स्मरून आमदार पदाची शपथ घेतली होती. एकंदर यावरून यापुढे महाराष्ट्राच्या प्रत्येक सभागृहात सीमा प्रश्नाला अग्रक्रम दिला जाणार हे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास महाआघाडीचे सरकार स्थापन होताच कर्नाटकातील नेते मंडळींचे धाबे दणाणले आहेत. त्याचप्रमाणे सीमाभागातील विविध कन्नड संघटना मराठी भाषिकांचा पोटशूळ उठला आहे. अस्वस्थ झालेल्या कन्नड संघटनांनी थयथयाट सुरू केला आहे. सीमा लढ्यात अग्रस्थानी असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींवर कन्नडीग नेतेमंडळींनी आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या भीमा शंकर पाटील या म्होरक्याने तर समिती नेत्यांना गोळ्या घाला असे वक्तव्य करून कन्नडी नेत्यांनी आपले ताळतंत्र कसे सोडले आहे हे जणू सोदाहरण दाखवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर आता कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताना हसन मुश्रीफ यांनी सीमा भागाचा उल्लेख केल्याने कर्नाटकी नेत्यांच्या उरात धडकी भरली आहे.