यमकनमर्डी मतदार संघामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाही. समितीचा संपूर्ण पाठिंबा आपला अधिकृत उमेदवार मारुती नाईक यांनाच आहे, असा जाहीर खुलासा बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील यांनी केला आहे.
गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांना पाठिंबा दिल्याचे नमूद करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या संदर्भात आज शुक्रवारी ॲड. एम. जी. पाटील बोलत होते. कालपरवा यमकनमर्डी मतदार संघाच्या बाबतीत एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना पाठिंबा दिल्याचा उल्लेख आहे. तथापी उदय सिद्दनावर यांनी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा जारकीहोळी यांना पाठिंबा असल्याचे त्या व्हिडिओत नमूद केले असले तरी ते अत्यंत चुकीचे आहे. कारण जारकीहोळी यांना पाठिंबा देण्यासंदर्भात सिद्दनावर यांनी आमच्याशी कोणती सल्लामसलत केलेली नाही. त्यामुळे पाठिंबा दिल्याचे त्यांचे वक्तव्य साफ खोटे आहे. यमकनमर्डी मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीने सतीश जारकीहोळी यांना कोणताही पाठिंबा दिलेला नाही.
यमकनमर्डी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मारुती नाईक हे अधिकृत उमेदवार आहेत आणि या अधिकृत उमेदवाराशी म. ए. समिती बांधील आहे. त्याप्रमाणे समितीकडून त्यांचा प्रचारही जोमाने केला जात आहे.
तेंव्हा बेळगाव तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जनतेने याची नोंद घ्यावी असे स्पष्ट करून गैरसमज करून न घेता समितीचे अधिकृत उमेदवार मारुती नाईक यांनाच बहुमताने विजयी करावे असे आवाहन ॲड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.