देशातील जवानांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्याबरोबरच आपल्या विविध मागण्या मान्य केल्या जाव्यात अशी मागणी करत यासंदर्भात जंतर-मंतर दिल्ली येथे सुरू असलेल्या माजी सैनिकांच्या बेमुदत धरणे सत्याग्रहाला बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनेने आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला असून तशा असे असे निवेदन देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना सादर केले आहे.
माजी सैनिक संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष सुभेदार के. बी. नौकुडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सेवानिवृत्त जवानांनी आज सोमवारी सकाळी उपरोक्त निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करून ते तात्काळ राष्ट्रपती पंतप्रधान आणि संरक्षण मंत्रांकडे पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
जवानांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी सैनिक संघटना ही बेळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. खानापूर, चिक्कोडी, अथणी, सौंदत्ती, रामदुर्ग, बैलहोंगल, गोकाक, रायबाग आदी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील देशाच्या संरक्षण दलांचे सेवानिवृत्त जवान या संघटनेचे सदस्य आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत आम्हा जवानांवर अन्याय होत आला आहे. याच्या विरोधात माजी सैनिकांच्यावतीने गेल्या 20 फेब्रुवारी 2023 पासून जंतर-मंतर, दिल्ली येथे बेमुदत धरणे सत्याग्रह सुरू केला आहे.
या आंदोलनाला बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनेचा तन-मन-धनाने संपूर्ण पाठिंबा आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जेंव्हा आम्हाला बोलवलं जाईल, तेंव्हा आम्ही आमचा जिल्हा आणि राज्याचे प्रतिनिधित्व करत त्यामध्ये निश्चितपणे सहभागी होणार आहोत. आमची सरकारला विनंती आहे की जवानांच्या मागण्या ज्या अतिशय योग्य व रास्त आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जाव्यात. अन्यथा आपले आंदोलन आणखी तीव्र करून जवानांना नाईलाजाने संसदेला घेराव घालावा लागेल.
तेंव्हा आम्हाला आशा आहे की केंद्र सरकार जवानांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्या तात्काळ मान्य करण्याद्वारे जवानांना न्याय देईल, अशा आशयाचा तपशील तसेच जवानांच्या विविध मागण्या देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि केंद्रीय संरक्षण मंत्री यांना धाडलेल्या निवेदनात नमूद आहेत.
निवेदन सादर केल्यानंतर बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार के. बी. नौकुडकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी पेन्शन वगैरे सुविधा देण्याच्या बाबतीत जवानांवर होत असलेल्या अन्यायाची तसेच आपल्या मागण्यांची प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष होनररी कॅप्टन नारायण पाटील, अशोक पाटील, सुभेदार मेजर हणमंत गुरव, ऑनररी कॅप्टन लक्ष्मण मुंगारी, प्रकाश माळवे, सुभेदार मेजर बाळकृष्ण गावडा, सुभेदार गोपाळ देसाई, नाईक मल्लाप्पा चौगुले आदींसह माजी सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.