Wednesday, May 8, 2024

/

आरक्षण कोटा राजकारण भाजपला पडणार का महागात?

 belgaum

सध्याच्या राखीवता धोरणामध्ये आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यात बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने केलेल्या बदलाचा येत्या 10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर खास करून कित्तूर कर्नाटक प्रदेशातील 56 मतदारसंघांमध्ये मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

कित्तूर कर्नाटकच्या या प्रदेशामध्ये कारवार, धारवाड, बेळगाव, बागलकोट, विजयपुरा, हावेरी आणि गदग जिल्ह्यांचा समावेश आहे. मुस्लिम समाजाचा 2-बी आरक्षण साचा मोडीत काढून तो लिंगायत आणि वक्कलिग या समाजांना देण्यात आल्यामुळे या भागातील मतदार पेचात पडले आहेत.

मोडीत काढलेल्या 2-बी कोट्या मधील आरक्षण 2 टक्क्यांनी वाढवून सत्ताधारी भाजपने लिंगायत समाजाला खुश करण्याचा असाध्य प्रयत्न केला असला तरी या प्रदेशातील बहुतांश लिंगायत मतदार त्यांच्या समाजाचे प्रमुख नेते बी. एस. येडीयुरप्पा यांना पक्षातून बाजूला केल्याबद्दल भाजपवर नाराज आहेत. तथापि येडीयुरप्पा यांनी स्वतः आपल्याला पक्षाने बाजूला सारले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 belgaum

गेल्या 2013 च्या निवडणुकीत काँग्रेसने या प्रदेशात 56 पैकी 34 जागा जिंकल्या होत्या आणि त्यानंतर 2018 मध्ये राज्यात आपले सरकारही स्थापन केले होते मात्र त्यावेळी काँग्रेस आणि निधर्मी जनता दलाची युती झाल्यामुळे 40 जागा मिळवून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले होते. आरक्षणाच्या मुद्द्याव्यतिरिक्त सातत्याने उचलला जाणारा काँग्रेसचा 40 टक्के कमिशनचा आरोप आणि भाजप आमदार माडाळ वीरूपाक्षप्पा यांच्यावरील लोकायुक्त धाड हे दोन मुद्दे भाजपची प्रतिमा बिघडवून देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतात.

दुसरीकडे म्हादाई प्रकल्पासह कित्तूर कर्नाटक प्रदेशामध्ये बोम्मई सरकारने हाती घेतलेले विविध जलसिंचन प्रकल्प भाजपसाठी मोठे दिलासादायक ठरू शकतात. तथापि राजकीय घडामोडी कशाही होत असल्या तरी काँग्रेसच्या 4 जागांविरुद्ध 15 जागा आपल्याकडे ठेवणारा भाजप कारवार, धारवाड आणि हावेरी जिल्ह्यामध्ये आपले वर्चस्व राखण्याची शक्यता आहे.

दरम्यान बेळगाव, बागलकोट, विजयपुरा आणि गदग जिल्ह्यातील महत्त्वाच्या 37 जागांच्या बाबतीत काय घडणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. सध्याच्या घडीला बेळगावमध्ये काँग्रेसच्या 5 जागांच्या तुलनेत भाजपकडे 13 जागा आहेत. विजयपुरामध्ये काँग्रेसकडे 2 आणि निजादेच्या एका जागेच्या तुलनेत भाजपकडे 4 जागा आहेत. त्याचप्रमाणे बागलकोटमध्ये भाजपकडे 5 जागा आणि काँग्रेसकडे 2 जागा आहेत. एकंदर विधानसभेत सत्ता मिळवण्यासाठीची चावी असलेल्या उपरोक्त 37 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

एकीकडे काँग्रेस बोम्मई सरकारच्या कमजोरींचे भांडवल करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे विजयाची आपली आशा बळकट करण्यासाठी भाजप मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह आपल्या स्टार प्रचारकांवर भरवसा ठेवून आहे. राज्यात अलीकडेच एका मागोमाग एक रोडशो करणारे पंतप्रधान मोदी कित्तूर कर्नाटक प्रदेशात आणखी प्रचार दौरे करण्याची शक्यता आहे. या प्रदेशातील सध्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई प्रतिनिधित्व करत असलेल्या शिमोगा मतदार संघामध्ये देखील यावेळी कडवी लढत अपेक्षित आहे. या मतदारसंघातून पंचमसाली लिंगायत समाजाचा चेहरा असणारे विनायक कुलकर्णी यांना उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा विचार असल्यामुळे इथे दोन लिंगायत उमेदवारांमध्ये लढत होण्याची संभावना आहे.

याव्यतिरिक्त विजयपुरा शहर, गोकाक, बेळगाव ग्रामीण, अथणी, रायबाग, धारवाड, भटकळ, कलघटगी, बदामी, गदग, हावेरी, निपाणी, सौंदत्ती आणि बेळगाव उत्तर या मतदारसंघांमध्येही जोरदार लढती अपेक्षित आहेत. बहुतांश मतदारसंघांमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी लिंगायत उमेदवार उभे करण्यावर भर दिला असला तरी मोठ्या प्रमाणात मतं फुटण्याच्या भीतीमुळे उमेदवार यादी जाहीर करण्यास विलंब केला जात आहे.

कांही कारणास्तव या प्रदेशातील लोकसंख्येच्या अनुकूलतेचा फायदा घेण्यासाठी भाजप सज्ज झाले आहे. एस. आर. बोम्मई यांच्या निधनानंतर जनता दल कोसळले आणि या पक्षाचे प्रमुख नेते जे. एच. पटेल आणि रामकृष्ण हेगडे यांनी भाजपची कास धरली. या पद्धतीने प्रभावी लिंगायत समाजाचे वारसदार त्यांची लोकप्रियता आणि संघटनात्मक यंत्रणेसह भाजपच्या पटावर आले.

लिंगायत नेते म्हणून असलेली येडीयुरप्पा यांची प्रचंड लोकप्रियता या प्रदेशात भाजपला आपले वर्चस्व गाजविण्यास सहाय्यभूत ठरली आहे. बेळगाव जिल्ह्यात जारकीहोळी आणि कत्ती कुटुंबीय भाजपचा पटलावर आल्यापासून गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी भाजप हा एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या बेळगावमध्ये भाजपने गेल्या कांही निवडणुकांमध्ये जबरदस्त कामगिरी नोंदवत बेळगावला आता स्वतःचा बालेकिल्ला बनविले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.