विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेने नगर विकास खात्याने केलेला घरपट्टी वाढ सुचनेचा प्रस्ताव तूर्तास प्रलंबित ठेवला आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने 2023 -24 या आर्थिक वर्षात 65 कोटी वसूल करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असून एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना 5 टक्के कर सवलत दिली जाणार आहे.
मागील वर्षी 55 कोटी रुपये घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट बेळगाव महापालिकेने समोर ठेवले होते. मात्र विविध कारणास्तव त्यापैकी 5 कोटींची घरपट्टी वसूल करण्यात महापालिकेला अपयश आले होते. आता 2023 -24 या नव्या आर्थिक वर्षात 65 कोटी रुपयांची घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
महापालिकेतील लोकनियुक्त सभागृहाने गेल्या एप्रिल महिन्यापासून घरपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव नाकारला होता. मात्र दर वर्षी 3 ते 5 टक्के घरपट्टी वाढवणे बंधनकारक असल्याने घरपट्टीत वाढ करण्याची सूचना नगर विकास खात्याने महापालिकेला केली होती. तथापि सध्या विधानसभा निवडणुकीच्या कामात महापालिका प्रशासन व्यस्त असल्याने तसेच आत्ताच जनतेचा रोष नको म्हणून घरपट्टीत वाढ करण्यात आली नाही.
नव्या आर्थिक वर्षाचे 65 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता तसेच महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना 5 टक्के कर सवलत दिली जाणार आहे.
जे मालमत्ताधारक 30 एप्रिलपर्यंत घरपट्टी भरतील त्यांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे. तरी नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेऊन त्वरित घरपट्टी भरावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.