सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असलेल्या महिलांनी बेळगाव जिल्ह्यातील मतदार संख्येमध्ये आता पुरुषांना मागे टाकले आहे.
गेल्या चार वर्षात जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या वाढली असून ती सध्या 69 हजार 317 इतकी नोंद झाली आहे. याउलट पुरुष मतदारांची संख्या मात्र 58 हजार 917 इतकी आहे.
गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या 1,27,655 इतकी वाढली आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्व 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आली आहे. त्यामुळे नवमतदारांची नोंदणी वाढण्याद्वारे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदारांची भर पडली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकी वेळी 2018 मध्ये जिल्ह्यातील मतदारांची संख्या 37 लाख 73 हजार 9990 होती. त्यापैकी 19 लाख 10 हजार 731 पुरुष तर 18 लाख 63 हजार 259 महिला मतदार होत्या. आता गेल्या 5 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी जाहीर झाली. त्यावेळी जिल्ह्यातील मतदारांची संख्या 38 लाख 33 हजार 37 इतकी झाली होती. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 19,36,887 तर महिला मतदारांची संख्या 18,96,150 इतकी होती. त्यानंतर पुन्हा मतदार संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 23 मार्च रोजी जिल्ह्यातील मतदारांची संख्या 39 लाख 1645 पर्यंत पोचली आहे. यामध्ये पुरुष मतदार 19 लाख 68 हजार 928 आहेत, तर महिला मतदारांची संख्या 19 लाख 32 हजार,057 इतकी आहे.
गेल्या पाच वर्षात वाढलेल्या मतदारांमध्ये 58 हजार 197 पुरुष तर 69 हजार 317 महिला मतदार आहेत. एकंदर गेल्या 4 वर्षात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत 141 ने वाढ झाली आहे.
येत्या 1 एप्रिल 2023 ला वयाची 18 वर्षे पूर्ण होणार असलेल्यांना मतदार यादी नावे नोंदविण्यास मुभा देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महाविद्यालयीन युवकांनी मतदार यादीत नांव नोंदणी करावी यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात आल्यामुळे यावेळी युवा मतदारांची संख्या देखील वाढणार आहे.