करोशी (ता. चिक्कोडी) येथील घरची परिस्थिती बेताची असलेल्या बाजीराव सुळकुडे याचे यकृत (लिव्हर) निकामी झाले असून जीव वाचण्यासाठी त्याच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी रु. 22 लाखाहून अधिक खर्च येणार असल्याने बाजीरावच्या मोठ्या भावाने थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली आहे.
करोशी (ता. चिक्कोडी) येथे आपल्या आई, पत्नी व दोन मुलासमवेत राहणाऱ्या 32 वर्षीय बाजीराव सुळकुडे याची घरची परिस्थिती बेताची आहे. पानपट्टीचे दुकान चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या बाजीरावला लिव्हर सिरोसीसच्या आजारामुळे आता 22 लाख रुपये खर्चाच्या यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांटशन) शस्त्रक्रियेची गरज आहे.
त्याचे मोठे बंधू पत्रकार के. एस. सुळकुडे यांनी आपल्या भावावर चिक्कोडी, निपाणी व बेळगाव येथील अनेक इस्पितळात उपचार करून घेतले. मात्र दुर्दैवाने त्याचा कांहीही उपयोग झालेला नाही. आजपर्यंत बाजीराव यांच्या उपचारासाठी 8 लाखा रुपयांपर्यंत खर्च आला आहे.
सध्या त्यांच्यावर बेळगावच्या केएलई डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंतच्या उपचाराच्या खर्चामुळे सुळकुडे कुटुंबाकडे शस्त्रक्रिया व इतर वैद्यकीय उपचारासाठी पैसे नाहीत. बाजीराव सुळकुडे यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असून लवकरात लवकर यकृत प्रत्यारोपणाची गरज आहे.
या शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी पैशाची जमावाजमा करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करून झाल्यानंतर पत्रकार के. एस. सुळकुडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई मदतीसाठी हाक दिली आहे.
आपल्या भावाला जीवदान मिळवून देण्यासाठी आवश्यक आर्थिक मदतीची व्यवस्था करावी, अशी कळकळीची विनंती सुळकुडे यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.