वाहतूक नियम भंग दंड वसुलीच्या नावाखाली एका जागी उभारून जा करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांना वेठीस धरणाऱ्या रहदारी पोलिसांना सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीमुळे आपली जागा बदलावी लागल्याची घटना काल गुरुवारी घडली.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, एपीएमसी रोड बसवण मंदिराजवळ गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक पोलिस विनाहेल्मेट वाहनांचा दंड वसूल करण्यात व्यस्त आहेत. काल अचानकपणे एक दुचाकी जात असताना वाहतूक पोलिसांनी तिला अडवले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दुचाकी चालकाने दोन्ही ब्रेक लावले. परिणामी एक विद्यार्थीनी दुचाकी वरून पडली. यावरून संबंधित दुचाकी स्वार आणि पोलीसांमध्ये जोरदार वादावादी झाली.
जमा झालेल्या नागरिकांनी देखील पोलिसांच्या कृतीचा निषेध केला. यावेळी समाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. तसेच वाहतूक पोलिसांना पुढे जाऊन दंड वसुलीसाठी उभे राहण्याची विनंती केली.
त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्या मार्गावरील दंड वसूली बंद करून काढता पाय घेतला. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या कृतीची नागरिकांमध्ये प्रशंसा होत होती.