विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या अशा पदवी पूर्व द्वितीय वर्षाच्या अर्थात बारावीच्या परीक्षेला आज गुरुवारपासून राज्यभरात कडक बंदोबस्तात प्रारंभ झाला आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 42 परीक्षा केंद्रांमध्ये ही परीक्षा घेतली जात आहे.
यंदा बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 25 हजार 390 विद्यार्थी विद्यार्थिनी बारावीची परीक्षा देत आहेत. यामध्ये 21,465 फ्रेश विद्यार्थी, 2,820 रिपीटर्स विद्यार्थी आणि 1,105 बहि:स्थ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आज गुरुवारी प्रथम भाषा कन्नड या विषयाने परीक्षेला सुरुवात झाली असून येत्या 29 मार्च पर्यंत ही परीक्षा चालणार आहे.
शहरातील लिंगराज कॉलेज, ज्योती कॉलेज, आरएलएस कॉलेज, जीएसएस कॉलेज, गोगटे कॉलेज, आरपीडी कॉलेज, सरदार्स पदवी पूर्व कॉलेज आदी ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्तात परीक्षेला सुरुवात झाली आहे.
बारावीची परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी परीक्षा केंद्र परिसरात 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर ठेवण्यात आली आहे. या खेरीज भरारी पथकांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यभरात एकूण 1,109 परीक्षा केंद्रांवर ही बारावीची परीक्षा पार पडणार आहे. तसेच राज्यातील 7 लाख 26 हजार 213 विद्यार्थी ही परीक्षा देत असून यापैकी 6 लाख 29 हजार 780 विद्यार्थी फ्रेश आहेत. पदवी पूर्व शिक्षण खात्याने आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे.