बेळगाव लाईव्ह : १९ मार्च रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली राजहंसगडावर होणाऱ्या दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ओरिएंटल कार्यालयात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आजी माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत राजहंसगडावर होणाऱ्या दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण सोहळ्याची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. राजहंसगडावर लोकप्रतिनिधींनी राजकारणासाठी दोनवेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे लोकार्पण केले, ही निषेधार्थ आहे.
आपल्या संस्कृतीचा आणि भाषेचा अभिमान असेल तर तो अभिमान दुग्धाभिषेक सोहळ्यात प्रत्येकाने दाखवावा असे आवाहन ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी या बैठकीत केले.
मराठी भाषिकांचे अस्तित्व आणि अस्मिता टिकविण्यासाठी सर्वांनी एकसंघ होणे आवश्यक असून सीमाप्रश्नाची सोडवणूक, विधानसभा निवडणूक यादृष्टीने आपली ताकद दाखविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. सीमाभागात राष्ट्रीय पक्षांकडून मराठी जनतेचा निवडणुकीपुरता वापर होत असून मराठी माणसात दुफळी पाडविण्याचे काम राष्ट्रीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून होत आहे. यामुळे सीमाभागात मराठी माणूस कमकुवत होत असून राष्ट्रीय पक्षांना आणि कर्नाटक सरकारला मराठी माणसाची ताकद दाखवून देण्यासाठी सर्वांनी एकसंघ होणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, ऍड. अमर येळ्ळूरकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, किरण सायनाक, सुनील बाळेकुंद्री, नेताजी जाधव, सुधा भातकांडे, रेणू मुतगेकर, रेणू किल्लेकर, नीलिमा पावशे, विनायक गुंजटकर, राकेश पलंगे, प्रकाश शिरोळकर, वर्ष आजरेकर, अनिल पाटील आदी उपस्थित होते.