बेळगाव लाईव्ह : राजहंसगडावरील शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून सुरु असलेल्या राजकारणामुळे समस्त मराठी भाषिक आणि शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेल्या गलिच्छ राजकारणाला सडेतोड प्रत्त्युत्तर देऊन मराठी भाषिकांची मते अशापद्धतीने मिळवता येणार नाहीत, हे ठामपणे सांगण्यासाठी येत्या १९ मार्च रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे शुद्धीकरण आणि दुग्धाभिषेक करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात मराठा मंदिरात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत समिती नेत्यांसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले, राजहंसगड येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे राष्ट्रीय पक्षांनी दोनदा अनावरण केल्याने अवमान झालेल्या शिवमूर्तीचा राज्याभिषेक सोहळ्या प्रमाणे 19 मार्च रोजी शुध्दीकरण करण्यात यावे. दुग्धाभिषेक आणि पाद्यपूजन देखील करण्यात यावे.
यावेळी गेल्या ८वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिवसृष्टीसंदर्भातही त्यांनी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसृष्टीमध्ये कोंडून ठेवण्यात आलेल्या शिवरायांच्या मूर्तीचे देखील शुद्धीकरण करण्याचा इशारा त्यांनी दिला.
राजहंसगडावर १९ मार्च रोजी आयोजिलेल्या सोहळ्यात हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी सहभागी व्हावे आणि हा सोहळा दिमाखदार पद्धतीने साजरा करावा, यासाठी जनजागृती करणे आवश्यक असून एकसंधपणे जनजागृतीकरून जनतेचा पाठिंबा मिळवूया, असे ते म्हणाले.
19 मार्च रोजी राजहंस गडावर होणाऱ्या राज्याभिषेक आणि शिवरायांच्या मूर्तीच्या सिद्धीकरणाच्या सोहळ्याच्या महाभोजन बनविणे आणि वाटपाची जबाबदारी येळळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीसह आजूबाजूच्या खेडेगावातील समितीच्या घटकांनी घेतली आहे.