बेळगाव लाईव्ह : वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या आयुक्तालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून उष्म्यामुळे संभाव्य आजार, काळजी व उपाययोजनांबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
भरपूर पाणी प्या आणि निरोगी राहा, उष्म्यामुळे संसर्गजन्य आजार आणि आरोग्याचे प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन खबरदारी घ्या असे आवाहन आरोग्य विभागाने परिपत्रकाच्या माध्यमातून नागरिकांना केले आहे.
भर उन्हामध्ये बाहेर पडताना गॉगल, टोपी आणि कॉटनचे कपडे वापरले जावेत. शूज किंवा चप्पल आवर्जुन परिधान केले जावे. लहान मुले, गरोदर महिला किंवा ज्येष्ठांनी दुपारी घराबाहेर न पडणे उत्तम असेल, ज्येष्ठांनी अधिकाधिक विश्रांती घ्यावी, मद्यप्राशन, चहा वा कॉफी न पिणे या कालावधीत आरोग्यासाठी उत्तम राहणार आहे.
मुबलक स्वरुपात पाणी पिण्यात यावे, या दिवसांत तहान लागत नसल्यास हे चांगले संकेत नाहीत. प्रवास किंवा घराबाहेर पडताना घरातून शुद्ध पाणी घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गरम करून थंड केलेले पाणी पिणे उत्तम राहील. शिवाय दूध, लस्सी किंवा फळांचे ज्यूस आणि त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून प्यावे. फळ किंवा फळांचा रस पिणे आरोग्यासाठी हितावह असेल. यात कलिंगड, द्राक्षे, अनानस, काकडीचा समावेश असावा. अशा परिपूर्ण सूचना परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्मा वाढतो आहे. यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने कशी खबरदारी घ्यावी, याबाबतचे पत्रक जारी केले आहे.