बेळगाव लाईव्ह : निवडणुकीसाठी मराठी मतांवर डोळा ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून राजकारण करण्यासाठी येळ्ळूर राजहंसगडावर भाजप आणि काँग्रेसने चढाओढ करून अनावरण सोहळे पार पाडले.
मात्र ज्या शिवरायांना मराठी समाज दैवत म्हणून पुजतो त्या शिवाजी महाराजांच्या गडावरील पावित्र्याची जबाबदारी घेण्यास दोन्ही राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना विसर पडला आहे.
२ मार्च आणि ५ मार्च रोजी राजहंसगडावर पार पडलेल्या भव्य कार्यक्रमानंतर गडपरिसरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला आहे. अनावरण सोहळा पार पाडून आजी-माजी लोकप्रतिनिधींनी रुबाब मारला. मात्र त्यानंतर लगेचच गडाकडे पाठ फिरवून आपले इप्सित साध्य केले आहे यामुळे मराठी भाषिकातून संताप व्यक्त होत आहे.
ढोल-ताशा, मर्दानी खेळ, मान्यवरांची उपस्थिती, भाषणे अशा विविध गोष्टींच्या माध्यमातून सोहळा भव्य दिव्य करण्यात गुंतलेल्या लोकप्रतिनिधींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाबाबतचे गांभीर्य नाही का? आपल्या वैयक्तिक आणि राजकीय स्वार्थासाठी आयोजिलेल्या सोहळ्यानंतर गडाच्या पावित्र्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे असंख्य हिंदू बांधवांचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे अशा राजकीय नेत्यांच्या गलिच्छ राजकारणाच्या सवयींकडे दुर्लक्ष करून गडप्रेमींनी आणि शिवप्रेमींनी राजहंसगडाची स्वच्छता करून पावित्र्य राखले आहे. राजहंस गडावरील कार्यकर्त्यांनी केलेल्या स्वच्छतेमुळे त्यांचे तमाम शिवभक्तातून कौतुक करण्यात येत आहे.