निवडणुकीत कोणीही मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोगाने सुरक्षित मतदान प्रक्रियेचा पर्याय हाती घेतला असून त्यानुसार आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 80 वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना अथवा दिव्यांगांना टपालद्वारे मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
अलीकडे युवा मतदारांचा आकडा लक्षणीय वाढला असला तरी दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती वगैरेंसारख्या समाजातील काही घटकांना मतदान केंद्रापर्यंत जाता येत नाही. अशा मतदारांसाठी सुधारित योजना हाती घेण्यात आली आहे. सदर मतदारांसाठी पोस्टल मतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. या स्वरूपाचा पर्याय यापूर्वी लोकसभा पोटनिवडणुकी देण्यात आला होता.
त्यानंतर आता येत्या विधानसभा निवडणुकीत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. खरे तर निवडणूक कर्मचारी, देशाच्या संरक्षण दलातील जवान आणि निवडणुकीत बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा पर्याय दिला जातो. मात्र आता त्यांच्या बरोबरीने 80 वर्षापेक्षा अधिक वय झालेले जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना पोस्टल मतदानाचा अधिकार देण्यात येत आहे.
दृष्टीहीन मतदारांसाठी ब्रेल लिपी विकसित करून त्याद्वारे मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागील काही निवडणुकीत सरासरी मतदान झाले नाही. सरासरीपेक्षा कमी मतदान शहरी भागात झाल्यामुळे भारतीय निवडणूक आयोगाकडून या दिशेने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तयारी केली जात आहे