बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्तू वितरित करण्याचे पेव सर्वत्र फुटले आहे. बेळगावमधील कानाकोपऱ्यात अनेक सभा-समारंभ-मेळावे-कार्यक्रमांचे आयोजन करून भेटवस्तू वितरित करण्यात येत आहेत.
या प्रकारामुळे अनेकठिकाणी गोंधळ निर्माण होत असून सोमवारीच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भेटवस्तू वितरण करण्यावर निर्बंध घालण्याचे आदेश जारी केले होते. मात्र बेळगावमधील राजकारणी या कोणत्याही गोष्टीला न जुमानता अजूनही सभा-समारंभाच्या माध्यमातून, भेटवस्तू वितरित करून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर बसवत असल्याचे निदर्शनात आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्ह्यात असे प्रकार आढळून आल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी दिला होता. अद्याप आचारसंहिता जाहीर झाली नाही मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्काळ उचलल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या काही निर्देशांचे पालन करणे अनिवार्य आहे, असे सांगत निवडणुकीच्या काळात मतदारांना आमिष दाखवू नये, यासाठी कडक कारवाई करण्यासाठी निवडणूक आयुक्तांनी निर्देश दिले होते.
मात्र हे आदेश धुडकावून लावत मंगळवार आणि बुधवार या दोन्ही दिवशी ग्रामीण भागासह दक्षिण मतदार संघात भेटवस्तू वितरण करत अनेक मेळावे भरविण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे.
सर्वसामान्य नागरिकांना नियम आणि कायद्याच्या चौकटीत अडकवून वेठीला धरणाऱ्या प्रशासनाकडून राजकारण्यांवर आणि नेत्यांवर कोणती कारवाई केली जाईल? कि बघ्याची भूमिका घेतली जाईल? याकडे सर्वांचे लक्ष आहे.