डॉ. आंबेडकर उद्यानातील 1.34 कोटीच्या विकास प्रकल्पाचा शुभारंभशहरातील सिव्हिल हॉस्पिटल नजीकच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये 1 कोटी 34 लाख रुपये खर्चून डिजिटल लायब्ररी अर्थात ग्रंथालय आणि अभ्यास केंद्राची उभारणी करण्यात येणार असून या विकास प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ आज शुक्रवारी सकाळी उत्साहात पार पडला.
सदर भूमिपूजन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विधिवत पूजन करून कुदळ मारण्याद्वारे विकास प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष मल्लेश चौगुले, दलित नेते सिद्धाप्पा कांबळे, अर्जुन देमट्टी, महादेव तळवार, दुर्गेश मेत्री, जीवन कुरणे, नगरसेवक संदीप जिरगाळ, नगरसेविका सविता कांबळे, नगरसेविका चिक्कलदिनी, सुधीर चौगुले, रमेश वड्डर, विनोद सोलापूर आदिसह शहरातील विविध दलित संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
भूमिपूजन समारंभ नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की, बेळगाव शहरात दलित समाज मोठ्या संख्येने आहे हे लक्षात घेता तसेच या डॉ. आंबेडकर उद्यानात सातत्याने दलित बांधवांच्या बैठका होत असतात. उद्यानातील शांत वातावरणामुळे या ठिकाणी विद्यार्थीही अभ्यासासाठी येथे येत असतात.
मात्र हे त्यांना जमिनीवर बसून खुल्यावर करावे लागत होते. त्यांना असे करावयास लागू नये. यासाठी उद्यानामध्ये वाचनालय अथवा आयएएस, केएएस अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि समाज कल्याण खात्याकडे माझा पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याला आता यश आले असून आज या प्रकल्पाचा शुभारंभ होत आहे. यासाठी मी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, समाज कल्याण खात्याचे मंत्री पुजारी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, महापालिका आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांच्यासह संबंधित सर्वांचा आभारी आहे असे सांगून सदर प्रकल्पाचे काम विद्यार्थ्यांची सोय होण्याच्या दृष्टीने पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजे येत्या जून -जुलै पूर्वी पूर्ण करण्याची सूचना आपण कंत्राटदाराला दिली असल्याची माहिती आमदार ॲड. बेनके यांनी दिली.
दरम्यान, दलित नेते मल्लेश चौगुले यांनी बेळगाव लाईव्हला दिलेल्या माहितीनुसार डॉ. आंबेडकर उद्यानातील 1.34 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत सांस्कृतिक भवन, डिजिटल लायब्ररी, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी हॉल आणि सुमारे 500 लोकांच्या क्षमतेचे सभागृह उभारण्यात येणार आहे. तसेच या सभागृहात भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसविण्यात येणार आहेत.