आमदारांनी सूचना केलेली असताना देखील विरोधी गटाला विश्वासात न घेता महापौर शोभा सोमनाचे यांनी आज सोमवारी बेळगाव महापालिकेचा 484 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळी अर्थसंकल्पाच्या प्रती मराठी, इंग्रजीला डावलून फक्त कन्नडमध्येच छापण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी जोरदार आवाज उठवून निषेध नोंदविला.
बेळगाव महापालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी आज सोमवारी सकाळी सभागृहाची बैठक महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अर्थसंकल्प जाहीर करण्यापूर्वी उपस्थित सर्व नगरसेवकांना अर्थसंकल्पाच्या प्रति वाटण्यात आल्या. मात्र त्या फक्त कन्नड भाषेतच असल्यामुळे ज्या नगरसेवकांना कन्नड येत नाही त्यांची गैरसोय झाली. निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक हे मराठी भाषिक आहेत तर कांही उर्दू भाषिक आहेत. या सर्वांना कन्नड येत नसल्यामुळे त्यांना अर्थसंकल्पाच्या प्रतीमध्ये नेमके काय छापले हेच कळण्यास मार्ग नव्हता.
यासंदर्भात सत्ताधारी गटाचे मराठी नगरसेवक मूग गिळून गप्प बसले असले तरी विरोधी गटाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी जोरदार आवाज उठवून जाब विचारला. आम्हाला नगरसेवक पदाची शपथ देताना ती कन्नड, मराठी आणि इंग्रजी भाषेत देण्यात आली तर मग अर्थसंकल्पाच्या प्रती फक्त कन्नड भाषेतच का? त्याचप्रमाणे महसूल स्थायी समितीची बैठक आयोजित करून सूचना घेतल्या जातात तसेच महसूल स्थायी समितीचे अध्यक्ष अर्थसंकल्प महापालिकेत मांडतात आणि ही प्रक्रिया डावलून अर्थसंकल्प कसा काय जाहीर केला जात आहे, असा सवाल त्यांनी केला.
या खेरीज अर्थसंकल्पासंदर्भात सूचना घेण्यासाठी कांही दिवसापूर्वी अचानक बोलविण्यात आलेल्या बैठकीस विरोधी गटाच्या नगरसेवकांना का बोलवण्यात आले नाही त्यांची मतं का जाणून घेण्यात आले नाहीत? बेळगाव दक्षिणचे आमदारांनी स्वतः विरोधी गटाला विश्वासात घेऊन अर्थसंकल्प तयार करा अशी स्पष्ट सूचना केली होती. मात्र तरीही आम्हाला का डावलण्यात आले? असा जाब नगरसेवक साळुंखे यांनी महापौरांना विचारला. त्याला विरोधी गटाच्या नगरसेवकांनी अनुमोदन दिले. त्यावर गोंधळलेल्या महापौर शोभा सोमनाचे यांनी स्वतःला बरे नव्हते वगैरे थातूरमातूर कारणे देऊन वेळ मारून नेली.
अखेर विरोधी गटाचे नगरसेवक आपल्याला विश्वासात न घेता अर्थसंकल्प तयार करण्यात आला असल्याची सातत्याने तक्रार करत असताना महापौर सोमनाचे यांनी कन्नडमध्ये महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाल्याचे घोषित केले. एकंदर अर्थसंकल्पावर कोणाचेही मत अथवा सूचना जाणून न घेता आजची अर्थसंकल्पीय बैठक अवघ्या अर्ध्या पाऊण तासात गुंडाळण्यात आली. बैठकीस शहराचे दोन्ही आमदार उपस्थित होते. अखेर राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली