बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) येथील श्री कलमेश्वर युवक (व्यायाम) मंडळाच्यावतीने येत्या शुक्रवार दि. 24 ते रविवार दि. 26 मार्च 2023 या कालावधीत दुपारी 12 वाजता बैलगाडी पळविण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीनिमित्त बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा शेतकरी मेळावा देखील होणार आहे.
सदर बैलगाडी पळविण्याची जंगी शर्यत लहान गट आणि मोठा गट अशा दोन गटात घेतली जाणार असून शर्यतीचा कालावधी 1 मिनिटाचा असणार आहे. यापैकी लहान गटाची शर्यत दि. 24 व 25 मार्च रोजी होणार असून मोठ्या गटाची शर्यत दि. 25 व 26 मार्च रोजी होईल. मोठ्या गटासाठी रोख रकमेची एकूण 15 बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली आहेत.
यापैकी पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 35, 30, 25, 20 व 18 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. लहान गटासाठी रोख रकमेची एकूण 12 बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली असून यापैकी पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 12, 10, 8, 6 व 5 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
तरी सदर शर्यतीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या हौशी बैलजोडी मालकांनी अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी श्री कलमेश्वर व्यायाम मंडळाचे अध्यक्ष, बेळगुंदी ग्रा. पं. सदस्य राजू किणयेकर (9483316548 किंवा 9480988606) यांच्याशी संपर्क साधावा. सदर जंगी शर्यतीचे औचित्य साधून बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शेतकरी मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. शर्यत आणि मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गडपणावर संघटनेचे चंदगड तालुकाप्रमुख बाळाराम फडके खास उपस्थित राहणार आहेत. यावेळी आर आय पाटील आदी उपस्थित होते.
या उभयतांची बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणयेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नुकतीच माजी खासदार राजू शेट्टी आदींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निमंत्रित केले आहे. तेंव्हा शर्यतीसह शेतकरी मेळाव्याला तालुक्यातील शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.