बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सरस्वती नामक महिलेने तिच्या तीन लहान मुलींसह कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली आहे.
मात्र या मायलेकी आता सुरक्षित आणि धोक्याबाहेर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तातडीने महिलेसह तिच्या तीन मुलींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यामुळे त्यांचा जीव बचावला आहे.
सावकारी कर्जाच्या त्रासाला कंटाळून सरस्वतीचा पती अदृशप्पा गेल्या दोन आठवड्यांपासून फरारी आहे. अदृशप्पा एका सलूनमध्ये काम करून उदरनिर्वाह करायचा. पती बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला. यावेळी या संघर्षातून मुक्त होण्यासाठी सरस्वती नामक महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयात मदत मागितली.
मात्र मानसिकरीत्या खचलेल्या सरस्वतीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. आपल्यासह तिने आपल्या ३, ८ आणि १४ वर्षाच्या तीन मुलींना कीटकनाशक दिले. आणि त्यानंतर आपणही सेवन केले. काही वेळानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उलट्या सुरु झाल्या.
हि बाब जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात येताच त्यांनी तातडीने या चौघींनाही जिल्हा रुग्णालयात हलविले. या घटनेची नोंद मार्केट पोलीस स्थानकावर करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.