मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करण्यावर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निर्बंध घातले असून असा प्रकार आढळून आल्यास संबंधित वाहन जप्त करण्याबरोबरच वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवला जाईल, असा इशाराही दिला आहे.
राज्यात मालवाहू करणाऱ्या वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्याचा प्रकार वाढला आहे. राज्य निवडणूक आयोगाने देखील हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. निवडणूक काळात हा प्रकार वाढण्याची शक्यता गृहीत धरून असा प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जावी, अशी सूचना आयोगाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे
त्यानुसार जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मंगळवारी याबाबतचा आदेश बजावला आहे. तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून नागरिकांनी प्रवास करू नये. वाहन मालकांनी देखील याबाबत खबरदारी घ्यावी व संभाव्य कारवाई टाळावी, असे आवाहन केले आहे.
मालवाहू वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची प्रकरणेही जिल्ह्यात घडली आहेत. अशा प्रकरणात मृतांच्या नातेवाईकांना भरपाई मिळालेली नाही. कारण मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून नागरिकांची नियम करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे आता नव्या आदेशाच्या अनुषंगाने पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन खात्याकडून जिल्ह्यात तशा वाहनांची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.