बेळगाव लाईव्ह : शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने इयत्ता चौथीच्या वरील सर्व वर्गांसाठी बोर्ड परीक्षेसारखे मूल्यमापन सुरू करण्याचा विचार केला आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू करण्याचा विचार सुरु असून सध्या इयत्ता सातवीपर्यंत कोणत्याही परीक्षा नाहीत. परंतु, सरकारने इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाचवी आणि आठवीचे मूल्यांकन केले जाणार असून ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावी परीक्षांदरम्यान वेळापत्रक आखण्यात येणार आहे. जर दहावीचा पेपर सकाळी असेल तर आम्ही इयत्ता पाचवी आणि आठवीचे पेपर दुपारी घेण्याचा विचार सुरु आहे. हे केवळ एकच मूल्यांकन असून पाचवी आणि आठवीचे मूल्यांकन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे स्पष्टीकरण सार्वजनिक शिक्षण खात्याचे आयुक्त डॉ. विशाल आर. यांनी दिले आहे.
इयत्ता दहावी आणि बारावीसाठी बोर्डाच्या परीक्षा होतच आहेत. मात्र आता इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीही परीक्षा सुरू करण्यात आल्यापासुन त्यानंतर इयत्ता सहावी, सातवी, नववी आणि ११ वीपर्यंतच्या वर्गाच्या परिक्षा घेण्याचा विचार सुरु असल्याचे शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. शिक्षणाची घसरलेली पातळी लक्षात घेऊन विशेषत: कोविडनंतरचे दिवस लक्षात घेत शिक्षण विभागाने सर्व स्तरांवर काही प्रकारची मूल्यांकन प्रणाली आणण्याचा निर्णय घेतला आहे.
शैक्षणिक वर्षाच्या मध्यातच परीक्षा जाहीर झाल्यामुळे अनेकांनी आक्षेप घेतला होता. यासाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच इयत्ता सहावी, सातवी, नववी आणि ११ वीच्या परीक्षांची घोषणा करण्याचा विचार करत आहोत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर परीक्षा सार्वजनिक परीक्षा नसून शालेय स्तरावरील मूल्यांकन असेल. खासगी विनाअनुदानित शाळांचेही सर्व स्तरांसाठी मूल्यांकन आवश्यक आहे, असे मत आहे.
परीक्षा होणार की नाही, याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण करण्यात आला. त्यानंतर आता परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने आता वेळापत्रक जाहीर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करू नये अशीही मागणी पुढे येत आहे.