वृत्तपत्र प्रसारमाध्यमांनी आवाज उठवताच शहरातील दिवसाढवळा जळणाऱ्या पथदिपांची दखल घेऊन ते बंद केले जातात. गोवावेस टिळकवाडी येथील हेस्कॉम कार्यालयाच्या बाबतीत मात्र कांहीसा ‘दिव्याखाली अंधार’ असा प्रकार पहावयास मिळत आहे.
या ठिकाणचे अधिकारी व कर्मचारी इतके निर्ढावलेले आहेत की त्यांच्या कार्यालयापासून अवघ्या 500 मीटरवर एक हॅलोजनचा पथदिप गेले कांही महिने 24 तास जळत असूनही त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. परिणामी हजारो युनिट विजेचा अपव्यय होत आहे.
गोवावेस टिळकवाडी येथील डिव्हाईन प्रॉव्हिडन्स शाळेसमोरील गवळी गल्ली शुक्रवार पेठ नजीक मंगळवार पेठ भंगीबोळाच्या शेवटी असलेला हॅलोजनचा पथदीप गेल्या कांही महिन्यांपासून दिवस -रात्र 24 तास जळत आहे.
यापूर्वी वारंवार तक्रार करण्यात आल्यानंतर अलीकडेच या संदर्भात एका जागरूक नागरिकाने हेस्कॉमचे अधिकारी आणि त्यांचे वरचे अधिकारी यांच्याकडे गोवावेस येथील हेस्कॉम कार्यालयाच्या तक्रार कक्षा तक्रार नोंदवली आहे. तेथील कर्मचाऱ्यांनी रजिस्टरमध्ये नोंद केलेल्या तक्रारीचा 179 हा क्रमांकही दिला आहे. मात्र आजतागायत तो पथदीप बंद करून त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
हेस्कॉमचा तक्रार निवारण कक्ष हा या पथदिपापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असूनही त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे हजारो युनिट वीज वाया जात आहे. परिणामी वाया जाणाऱ्या या विजेचा भुर्दंड महापालिका कराच्या स्वरूपात सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन 24 तास ढणाढणा जळत असलेला तो उच्च दाबाचा हॅलोजन पथदीप बंद करून विजेची बचत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक अवर्सेकर आणि परिसरातील जागरूक नागरिकांनी केली आहे.