बेळगाव लाईव्ह : शहरीकरणाच्या आणि विकासाच्या नादात निसर्गाशी खेळ करणे कोणत्याही कारणास्तव कमी होत नाही. बेळगावमध्ये स्मार्ट सिटी योजना अंमलात आल्यापासून निसर्गाची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. वारंवार पर्यावरण प्रेमींकडून याला विरोध करून, झाडांची कत्तल करून भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांविषयी जागरूक करूनही प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे.
बेळगावमध्ये सध्या गांधीनगर ते सांबरा विमानतळ रस्त्याचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी या मार्गावर असणाऱ्या झाडांची बेसुमार कत्तल होत असल्याचे निदर्शनात आले आहे. याचप्रमाणे बेळगावमधील विविध ठिकाणी सुरु असलेल्या विकासकामादरम्यान जुनाट वृक्षांची कत्तल केल्याचेही अनेकवेळा प्रसारमाध्यमांनी समोर आणले आहे. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान जिल्हाधिकारी आवारासह बेळगावमधील अनेक ठिकाणी शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विकासकामादरम्यान बेसुमार वृक्षतोड करण्यात आलेली निदर्शनात आले आहे. सिव्हिल हॉस्पिटल समोरील झाडे, टिळकवाडी या भागातील झाडे, समर्थ नगर, गांधीनगर यासह अनेक ठिकाणी हाती घेण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामकाजादरम्यान अमाप वृक्षसंपत्तीची हानी करण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे.
वाहतुकीची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालल्याने बेळगाव ते सांबरा मार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. मात्र, रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे हा परिसर पूर्णपणे भकास दिसू लागला आहे. रुंदीकरणासाठी या भागातील तब्बल ४०० झाडांची कत्तल केली जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. मात्र यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
गेल्या वर्षभरात वृक्षतोडीचे असे अनेक प्रकार समोर आले आहेत. रस्ता बांधकामादरम्यान अडचण ठरणाऱ्या वृक्षांची कोणताही मुलाहिजा न बाळगता कत्तल केली जाते. एकीकडे सरकारी कार्यक्रमात सुरुवातीला वृक्षारोपण करणे आणि दुसरीकडे विकासाच्या नावावर शहर आणि परिसराला भकास करू पाहणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना नेमका कोणत्या गोष्टीचा विकास करावयाचा आहे? असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत.
स्मार्ट सिटी योजना असो किंवा इतर कोणते विकासकाम यादरम्यान विकासाच्या नावावर होणारी नागरिकांची दिशाभूल आणि विकासाच्या नावावर निसर्गसंपदेचा ऱ्हास हि सारी परिस्थिती पाहता ‘भीक नको पण कुत्रा आवर’ असे म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे.