बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत घट झाल्याने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर बेळगावकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्यात वेळेत पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची समस्याच निर्माण होऊ शकते.
पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बेळगावमध्ये सुरु असलेली २४ तास पाणी योजना सध्या विस्कळीत होण्याच्या मार्गावर असून खबरदारीच्या उपाययोजना म्हणून नियमित वेळापत्रकात बदल करून उशिरा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
राकसकोप जलाशयाची पाणी पातळी कमी झाली असून मागील वर्षीच्या तुलनेत अंदाजे चार फूट पाणी पातळी कमी झाली आहे. जून महिन्यात पावसाळा सुरुवात झाली तर उत्तमच आहे परंतु उन्हाळ्याच्या दिवसात जनतेने पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाणीपुरवठा मंडळाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
सध्या राकसकोप जलाशयात २४७५ फूट पाणी साठा असून फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवल्याने संपूर्ण उन्हाळा कसा घालवायचा असाही प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.
राकसकोप जलाशयातील पाणीसाठ्याच्या पातळीत झालेली घट लक्षात घेता नेहमीपेक्षा जास्त पाणी उपसा झाल्याचे दिसून येत आहे. पावसाळा विलंब झाल्यास शहराच्या पाणी पुरवठात व्यत्यय येण्याचीही शक्यता आहे. तसेच पाणी पुरवठ्यात कपात करण्यात येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे हि परिस्थिती पाहता नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.