बेळगाव लाईव्ह : रेल्वेस्थानकाच्या गोडाऊनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती लपविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर बेळगावमधील जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.. हा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आल्यानंतर तब्बल ६ तासांहून अधिक काळ याठिकाणी आंदोलन सुरु होते. दरम्यान गेल्या ५ दिवसांपासून सुरु असलेली शिवसन्मान पदयात्रा याठिकाणी आली आणि घडलेला प्रकार लक्षात येताच जोरदार घोषणाबाजी करत जोरदार संताप व्यक्त करण्यात आला.
रविवारी दुपारी रेल्वेस्थानकाच्या गोडाऊनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लपविले शिल्प उजेडात आल्यानंतर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकवटली. अवघ्या २४ तासाच्या आत देशाचे पंतप्रधान ज्या ठिकाणी येणार आहेत, त्या ठिकाणचे स्वरूप आणि परिस्थिती रविवारी पाहण्यासारखी होती. एकाबाजूला भीमसेनेचे कार्यकर्ते आणि एका बाजूला शिवसन्मान पदयात्रेत सहभागी झालेले कार्यकर्ते एकवटले आणि संपूर्ण रेल्वेस्थानक घोषणांनी दणाणले.
गेल्या कित्येक दिवसांपासून रेल्वेस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती किंवा शिल्प बसविण्यात यावे, यासाठी आंदोलन सुरु आहे. मात्र जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांचे शिल्प गोडाऊनमध्ये लपवून ठेवून रेल्वे विभागातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी जनतेच्या भावनांशी खेळ केला आहे. याविरोधात आज उग्र आंदोलन छेडत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
रमाकांत कोंडुसकर यांच्यासह अनेक समिती नेते यावेळी उपस्थित होते. रेल्वेस्थानकात लपविण्यात आलेल्या शिल्पासंदर्भात ज्यावेळी माहिती पुढे आली त्यावेळी संतापाचा उद्रेक झाला. आणि रेल्वेस्थानकाला आंदोलन स्थळाचे स्वरूप प्राप्त झाले. यावेळी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले, हा जातीयवाद पसरवू पाहणाऱ्या राजकारण्यांचा डाव आहे. याचा जाब बेळगावमधील जनता नक्कीच राजकारण्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना विचारेल.
सदर प्रकारामुळे समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून जोवर रेल्वेस्थानकावर दोन्ही महापुरुषांचे शिल्प बसविले जाणार नाही तोवर रेल्वेस्थानकाचे उद्घाटन करू देणार नाही, असा निर्धार रमाकांत कोंडुसकरांनी बोलून दाखविला.