बेळगाव लाईव्ह : रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसन्मान पदयात्रा गावोगावी, गल्लोगल्ली फिरत आहे. या पदयात्रेकडे जनता औत्सुक्याने आणि कुतूहलाने पाहत आहे. एका विशेष निश्चयाने आणि ध्येयाने प्रेरित झालेला माणूस कोणत्या पद्धतीने आपल्या कार्याशी भिडतो याचं एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रमाकांत कोंडुसकर यांची ही पदयात्रा आहे.
फेब्रुवारी महिन्यात असलेल्या रणरणत्या उन्हाचे चटके झेलत, वरून तापत असलेल्या सूर्यनारायणाच्या झळा झेलत रमाकांत कोंडुसकर आणि त्यांचे कार्यकर्ते गावोगावी संदेश देण्यासाठी फिरत आहेत. बुधवारी राजहंस गडापासून सुरू झालेली ही पदयात्रा धामणे विभागात पोहोचली होती. त्यानंतर आज गुरुवारी देसूर, झाडशहापूर, सुळगे, मच्छे या भागातही शिवसन्मान पदयात्रा पोहोचली. याचप्रमाणे हुंचेनट्टी, बहाद्दूरवाडी, खादरवाडी आदी भागातही या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एका खोलीत फॅन किंवा एसी समोर बसून, काही मोजक्या लोकांसमोर बैठक घेऊन मोठ्या वल्गना करणाऱ्यांपेक्षा, रस्त्यावर उतरून आपल्या सहकाऱ्यांबरोबर जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या रमाकांत कोंडूसकर यांच्यासारख्या लढाऊ बाण्याच्या नेत्याचे जनतेतून कौतुक होत आहे.
रमाकांत कोंडूसकर यांची एकंदर आजवरची कारकीर्द पाहता रस्त्यावरील लढाऊ कार्यकर्ता अशीच त्यांची ओळख आहे. विविध प्रश्नांशी थेट लढून त्यांनी एकप्रकारचं नेहमीच आव्हान झेललं आहे.
सध्या याप्रकारच्या पदयात्रेचे आयोजन करून शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न यासह सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन रमाकांत कोंडुसकर थेट रस्त्यावर उतरले आहे. पदयात्रेच्या माध्यमातून थेट जनतेच्या दारात जाऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते आपल्या कार्यकर्त्यांसमवेत समक्ष जात आहेत. सध्या बलिदान मास सुरु असून रमाकांत कोंडुस्कर यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते बलिदान मास पाळत आहेत. अशा परिस्थितीत रणरणत्या उन्हात अनवाणी पायांनी पदयात्रेत संचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचेही कौतुक आहे.
ज्या पद्धतीची ध्येय धोरणे ठेवून या पदयात्रेचे आयोजन केले आहे, त्यानुसार जनताही पाठिंबा व्यक्त करत आहे. शिवाय पदयात्रेचे कौतुकही करत आहे. याचबरोबर रमाकांत कोंडुसकरांचा जो निर्धार आहे या निर्धाराच्या माध्यमातून अनेक प्रश्नांची धुरा त्यांच्या हाती दिल्यास प्रश्न नक्कीच मार्गी लागतील अशी आशा जनतेतून व्यक्त होत आहे.