अमेरिकेत महागड्या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी कर्जबाजारी होत आहेत हे लक्षात घेऊन मी खासदार या नात्याने त्यावर उपाय शोधून अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. कारण शिक्षणामुळेच आपण जीवनात यशस्वी होऊन प्रगती करू शकत असल्यामुळे शिक्षण हे जास्त खर्चिक असू नये असे माझे मत आहे, असे विचार अमेरिकेच्या संसदेतील मराठी खासदार डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी व्यक्त केले.
टिळकवाडीतील एसकेई सोसायटीच्या आरपीडी आणि जीएसएस कॉलेजतर्फे आज गुरुवारी सकाळी आयोजित आपल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. एसकेई सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाप्रसंगी व्यासपीठावर सन्माननीय अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्रा. माधुरी शानभाग, प्राचार्य बी. एन. मजूकर आणि प्राचार्या अनुजा नाईक उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर किरण ठाकूर यांच्या हस्ते खासदार डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य मजुकर यांनी किरण ठाकूर व प्रा. शानभाग यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ श्रीनिवास ठाणेदार यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. मी सातासमुद्रापलीकडे गेलो असलो तरी सुद्धा घरातील हे जे कौतुक आहे त्याचे महत्त्व वेगळे आहे, त्यासाठी मी आभारी आहे, असे ते म्हणाले. सध्या मी अमेरिकेच्या संसदेत खासदार असलो तरी एकेकाळी शहापूर मधील बेताची परिस्थिती असलेल्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरात मी लहानाचा मोठा झालो.
शहापूरमधील एक सर्वसामान्य विद्यार्थी असणारा मी शाळेमध्ये अभ्यासात तितकासा चांगला देखील नव्हतो. शाळेतून जेव्हा महाविद्यालयीन शिक्षणासाठी जीएसएस कॉलेजमध्ये आलो. तेंव्हाच मी जीवनात काहीतरी बनवून दाखवायचे असे ठरवले आणि संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले असे सांगून ठाणेदार यांनी कॉलेज जीवनातील आपल्या कांही आठवणी सांगितल्या. तसेच अमेरिकेतील राजकीय प्रवासाची माहिती देताना त्या ठिकाणच्या महागड्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने आपण चालवलेल्या प्रयत्नांची माहितीही दिली. शिक्षणामुळेच आपण जीवनात कर्तुत्ववान बनू शकतो. त्यामुळे मुळात शिक्षण हेच जास्त खर्चिक असता कामा नये, असे असे मतही डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रा. माधुरी शानभाग यांनी समयोचित विचार व्यक्त करताना उपस्थित विद्यार्थी -विद्यार्थिनींना जीवनात डॉ ठाणेदार यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले तसेच डॉ श्रीनिवास ठाणेदार यांनी लिहिलेल्या ‘ही श्रीची इच्छा’ या पुस्तका विषयी थोडक्यात माहिती दिली.
अखेर किरण ठाकूर यांच्या अध्यक्षीय भाषणाने समारंभाची सांगता झाली. डॉ. एस. एन. देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानले. समारंभास निमंत्रितांसह हितचिंतक कॉलेजचा प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.