Monday, January 13, 2025

/

निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रतिनिधींना मराठीचा पुळका!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी माणूस आणि मराठी माणसाच्या वेदना या केवळ राजकीय नेतेमंडळींसाठी निवडणुकीचे कोलीत असल्याप्रमाणे असते. निवडणुका जवळ आल्या कि प्रत्येक वेळी प्रत्येक राष्ट्रीय पक्षांना मराठीचा पुळका येतो. मराठी मतदारांना लक्ष्य करत मराठीचे गाजर पुढे नाचवत निवडणुकांचा मौसम ‘कॅच’ करण्याच्या प्रयत्नात असलेले लोकप्रतिनिधी आपण नेहमीच पाहतो. सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहात आहेत. बेळगावमधील ग्रामीण, दक्षिण, उत्तर मतदार संघात मराठीचे प्राबल्य अधिक आहे. यामुळे निर्णायक असलेली मराठी मते आपल्या पारड्यात टाकण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मराठी जनतेला खुश करण्याचे तंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे.

एरव्ही मराठीची कावीळ असल्याप्रमाणे वागणाऱ्या राजकारण्यांना ऐन निवडणुकीतच मराठी विषयी कमालीची आपुलकी वाटत आहे. समस्त मराठी भाषिकांचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांवरील आदर अचानक वाढला आहे. एरव्ही मूर्ती बसविणे, हटविणे आणि यावरून सुरु होणाऱ्या गोंधळादरम्यान बघ्याची भूमिका घेऊन, झालेल्या घटनांवर ‘ब्र’ सुद्धा न काढणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता थेट मूर्ती, मूर्ती परिसर आणि इतिहासकालीन देखावे जनतेसाठी उपलब्ध करून देण्याची जणू चढाओढ लागली आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून शिवभक्तांकडून देखरेख करण्यात येणाऱ्या राजहंसगडाचा कायापालट असो, राजहंसगडावर छत्रपती शिवरायांची मूर्ती प्रतिष्ठापना करणे असो, बऱ्याच कालावधीपासून शिवसृष्टी खुली करण्याबाबत जनतेने तगादा लावूनही रखडलेली शिवसृष्टी अचानक जनतेसाठी खुली करण्याचा प्रयत्न असो, वर्षानुवर्षे धर्मवीर छत्रपती संभाजी चौकात मूर्ती समोरच थांबविले पोलीस वाहन मूर्ती परिसरात अडथळा निर्माण करत होते. मात्र जशा निवडणुका जवळ आल्या तसा या परिसराच्या सुशोभीकरणाचा विडा उचलून युद्धपातळीवर मूर्ती परिसराचा कायापालट करण्यात आला. हि एकंदर परिस्थिती पाहता ऐन निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रतिनिधींचे मराठी प्रेम उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय्य हक्कानुसार मातृभाषेतून सरकारी कागदपत्रे मिळावीत यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येत आहे. भाषेच्या वादामुळे सीमाभागात अनेक आंदोलने उभी राहतात. मराठी माणूस घटनेने दिलेल्या अधिकारापासून वंचित आहे. यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सरकार दरबारी सातत्याने आपल्या व्यथा मांडणाऱ्या मराठी भाषिकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या राजकारण्यांना निवडणुका जवळ आल्यावरच मराठी संस्कृती आणि मराठी माणसाची आठवण कशी होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सीमाभागातील मराठी माणसाची निर्णायक मते मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये जणू स्पर्धा सुरु आहे. मात्र मराठी माणसाने राष्ट्रीय पक्षांची हि खेळी वेळीच ओळखून आपली मराठी अस्मिता आणि स्वाभिमान जागा करून आगामी विधानसभा निवडणुकीत आपला निर्णय मतदानाच्या माध्यमातून जगासमोर आणणे गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.