सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेळगाव विभागातील सजावटीच्या पथदिपांची (डेकोरेटिव्ह स्ट्रीट लाईट) प्रतिखांब किंमत 83,296 रुपये असल्याचे बेंगलोर मिरर या इंग्रजी दैनिकाने आपल्या पथदिपा संबंधीच्या वृत्तांत नमूद केले आहे.
कर्नाटक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) नोंदणीकृत कंत्राटदार संघटनेने एका औपचारिक तक्रारीद्वारे सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सर्रास भ्रष्टाचार सुरू असल्याचे मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
एका कंत्राटदाराने अनामित राहण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंत्राटदाराने बेळगाव विभागात जीएसटीसह पथदिपांचा प्रतीखांब 83 हजार 296 रुपये इतक्या खर्चाने प्रकल्प हाती घेतला होता, त्याला त्याच खांबासाठी चित्रदुर्ग विभागात जीएसटीसह 1,20,000 रुपये उद्धृत करावे लागले आहेत.
याला कारण काय तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांनी शिमोगा विभागासाठीही समान खर्च मंजूर केला होता. हा प्रकार लक्षात घेता करदात्यांचे पैसे वाया जाण्यापासून वाचावेत हा कंत्राटदारांचा हेतू आहे.
यासाठीच मुख्य सचिवांकडे तक्रार करण्याबरोबरच करदात्यांचे पैसे वाया जाऊ नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे.