श्री भगवान महावीर स्वामींच्या 2621 व्या जन्म कल्याण महोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 14 एप्रिल रोजी बेळगावात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत चाळीस चित्ररथ त्याचबरोबर 100 बुलेट स्वार युवक-युवती सहभागी होणार आहेत. जन्म कल्याण महोत्सवानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जन्म कल्याण महोत्सव समितीचे कार्यदर्शी राजेंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.
श्री भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सवास संदर्भात अधिक माहिती देताना राजेंद्र जैन पुढे म्हणाले, बेळगावात गेल्या 23 वर्षांपासून श्री भगवान महावीर जन्म कल्याण सोहळा भव्य स्वरूपात साजरा केला जात आहे.कोरोना महामारी मुळे गेली दोन वर्ष जन्म कल्याण सोहळा साजरा झाला नाही. यावर्षी जन्म कल्याण महोत्सवानिमित्त तीन एप्रिल पासून विविध सामाजिक संस्कृती कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. रक्तदान शिबिर, महिलांसाठी विविध स्पर्धात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर आज बारा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता हिंजवडी महावीर भवन येथे सुप्रसिद्ध हास्यकवी श्री जगदीप जैन यांच्या हास्य कवि सम्मेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक येथून भव्य शोभा यात्रेला सुरुवात होईल. शोभायात्रेत जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांच्यासह आजी-माजी खासदार,आमदार,जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस आयुक्त व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शहर उपनगरातील विविध मार्गांवर फिरून हिंदवाडी महावीर भवन येथे शोभायात्रेची सांगता होईल. शोभायात्रेत प्रथमच शंभर बुलेट स्वार युवक-युवती सहभागी होणार आहेत. 40 चित्ररथ शोभायात्रेचे आकर्षण ठरणार आहेत.
शोभायात्रेच्या सांगते नंतर महावीर भवन येथे महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होईल. पंचवीस ते तीस हजार लोकांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे. शोभायात्रा मार्गावर कार्यकर्ते स्वच्छतेचे कार्यही करणार आहेत.असेही राजेंद्र जैन यांनी स्पष्ट केले. यावेळी जन्म कल्याण महोत्सव समितीचे राजेंद्र जक्कण्णावर,राजु खोडा,हिराचंद कलमनी,कुंतीनाथ कलमनी,संजय पोरवाल आदी उपस्थित होते.