हिंडलगा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी विकासकामांसाठी पत्र देण्याची विनंती केल्यामुळे मी पत्र दिले हे खरे असले तरी कंत्राटदार संतोष पाटील यांना मी प्रत्यक्षात कधीच भेटले नाही. असा महत्त्वाचा खुलासा माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष आशा एहोळे यांनी केला आहे.
कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी गुरुवारी शहरांमध्ये पत्रकारांशी बोलताना माजी जि. पं. अध्यक्षा आशा एहोळे म्हणाल्या की, 2020 मध्ये हिंडलगा गावची महालक्ष्मी देवीची यात्रा होती. त्यासंदर्भात हिंडलगा ग्रामपंचायतीचे सदस्य मला भेटले होते. त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पत्र देण्याची विनंती मला केली होती.
त्यानुसार मी पत्र दिले, परंतु माझ्या पत्रावर नंतर काय कार्यवाही झाली हे मला माहीत नाही. ग्राम विकास आणि पंचायत राज्य खात्याने त्या कामांना मंजुरी दिल्याचे मला आजच समजले आहे. कंत्राटदार संतोष पाटील आणि माझी प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही असे सांगून त्यांनी आत्महत्या केल्याचे मला प्रसारमाध्यमांमुळे कळाले. संतोष पाटील यांनी हा मार्ग पत्करावयास नको होता, अशी खंतही एहोळे यांनी व्यक्त केली.
ग्राम विकास आणि पंचायत राज्य खात्याने माझ्या पत्राला पोच दिल्याची पावतीही मला मिळालेली नाही. जिल्हा पंचायत अधिकारी ती पावती आपल्या कागदपत्रात संग्रही ठेवतात. कामांना मंजुरीसाठी या ग्रामपंचायतीचे सदस्य मला भेटले असले तरी कामे केल्याबद्दल त्यांनी मला कसलीच माहिती दिली नाही. माझ्या पत्रानंतर कामांना मंजुरी मिळाल्याची पोच मला आजच मिळाली आहे.
कामाला 17 फेब्रुवारी 2021 रोजी मंजुरी दिल्याचा उल्लेख त्यात आहे, असेही आशा एहोळे यांनी स्पष्ट केले. सदर प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी सखोल तपास केला पाहिजे. मी दिलेल्या पत्राबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कितपत माहिती आहे मला माहित नाही, असेही आशा एहोळे यांनी सांगितले.