Wednesday, January 8, 2025

/

पित्तखडे-काय आहेत डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

पोटाच्या वरच्या बाजूला यकृत असते व यकृताच्या खालच्या बाजूस जरा उजवीकडे एका खोबणीत असते पित्ताशय. लहानशा लांबट फुग्यासारखे हे पित्ताशय यकृताकडून तयार होऊन येणारा पित्तरस साठवते. पित्तरसामुळे स्निग्ध पदार्थांचे अतिसूक्ष्म, पाण्यात विरघळू शकणार्‍या कणांमध्ये रूपांतर होते. पित्ताशयाला सूज येणे, पित्ताचे खडे तयार होणे इ. पित्ताशयाचे विकार होऊ शकतात. पित्तरसाचे घटक व त्यांची रचना यात बदल घडले की पित्ताचे खडे तयार होतात. अतिरिक्त कोलेस्टेरॉल व पित्तरंगद्रव्य यांची (बाईल सॉल्टस्) कमतरता किंवा असमतोल यामुळे पित्तरस संपृक्त, दाट बनतो व या कोलेस्टेरॉलचे  स्फटिकीकरण  होऊन खडा तयार होतो. काही विकारांमध्ये फक्त पित्तरंगद्रव्यांचेसुध्दा खडे बनतात. तर काही वेळा दाट घट्ट झालेला पित्तरस पित्ताशयदाहाला कारणीभूत ठरतो.
कारणे- वाढत्या वयाची स्थूल, रजोनिवृत्ती जवळ आलेली स्त्री, जुनाट बध्दकोष्ठ असलेल्या व्यक्ती, मानसिक तणावाखाली असलेली स्त्री पुरूष, कुपोषित व्यक्ती अशा सर्वांना पित्तखडे होऊ शकतात. काही विशिष्ट साथीचे रोग होऊन गेल्यावरही  पित्ताशयाचा दाह होऊ शकतो. आहारामध्ये कर्बोदकांचे विशेषतः साखरेचे पदार्थ जास्त असल्यास पित्ताशयाचे त्रज्ञस सुरू होतात. शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त उष्मांक असलेले मेदयुक्त पदार्थ खाल्याने वाढते व पित्ताचे खडे तयार होण्यास चालना मिळते. चिनी लोक पित्ताशयाच्या आजाराचे कारण रागीट स्वभाव मानतात.
लक्षणे- पित्ताशयातच खडा असेल व आकाराने लहान असेल तर कोणतीही लक्षणं आढळत नाहीत. पण पित्तवाहक नलिकेत जर पित्तखडा अडकला तर मात्र सतत वेदना सुरू होतात. पोटात उजव्या बाजूला दुखणे व उजव्या खांद्याच्या कडेला दुखणे ही लक्षणं पित्तखड्याची निदर्शक असतात. अपचन, गॅसेस, पोट डब होणे, बध्दकोष्टता, मळमळ, भोवळ येणे, कावीळ होणे, अशक्तपणा, चेहर्‍यावर मुरूम येणे ही लक्षणे कमी अधिक फरकाने आढळून येतात.
उपचार
1. होमिओपॅथी- मध्यमवयीन साधनाताईंना अलीकडे सारखाच गॅस व्हायचा. पोटातही राहून राहून दुखायचं. सोनोग्राफीमध्ये छोट्या आकाराचा (6 मिलीमीटर) पित्तखडा आढळला. तशी शक्त्रक्रियेची आवश्यकताही वाटत नव्हती. त्यांना समजलं की होमिओपॅथीने पित्तखडे विरघळतात म्हणून! त्यांची दिनचर्या, खानपान, काही विशिष्ट लक्षणे या सगळ्यांचा संदर्भ घेऊन त्यांना होमिओपॅथिक उपचार दिले असता त्यांची पोटदुखी पुरती कमी झाली, पचन सुधारले व चार महिन्यांची सोनोग्राफीमध्ये पित्तखडाही दिसला नाही. अशी ही अद्भुत होमिओपॅथिक औषधे! कोलेस्टेरीनम, चायना, चेलीडोनियम, लायकोपोडियम अशी औषधं होमिओपॅथीमध्ये पित्तखड्यासाठी वापरली जातात.
2. निसर्गोपचार-
ऑलिव्ह व सूर्यफुल तेल- कुठलीही प्रक्रिया न केलेले नैसर्गिक स्वरूपातील ऑलीव्ह किंवा सूर्यफूल तेल पित्तखड्यावर उपयुक्त आहे. पाव कप सूर्यफूल तेल सकाळी अनशापोटी घ्यावे त्यावर लगेच द्राक्षांचा रस एक कप घ्यावा. गरजेप्रमाणे हा उपचार काही दिवस ते काही आठवडे घ्यावा लागतो. या उपचाराने मूत्रखडेही कमी होतात.
पीअर- पीअर हे फळ आता भारतातही सहज उपलब्ध आहे. हे फळ नुसते खाल्याने किंवा रस प्याल्याने पित्ताशयाच्या सर्व तक्रारी दूर होतात.
चिकोरी- चिकोरी या झाडाची फुले बिया आणि मुळे ही पित्ताशयाच्या तक्रारींवर वापरतात. यांचा नर्क दिवसातून पाव कप तीन वेळा प्यावा. त्यामुळे शुध्द पित्तरस स्रवतो. पित्तरसाचा संप्रृक्तपणा कमी होतो. यकृत व पित्ताशय या दोन्ही अवयवांसाठी हे चांगले औषध आहे.
बाराक्षार- मॅग फॉस 6ु आणि नॅट्रसल्फ 12ु यांचे मिश्रण पित्तखडंयावर उपयुक्त ठरते.

योगसाधना- अर्धतत्स्येेद्रियासन, भुजंगासन, गोमुखासन, जानुशिरासन, पिश्चमोत्तासन, पवनमुक्तासन तसेच प्राणायाम यांचा उपयोग निश्चित होतो.
आहार- प्रथम दोन दिवस लंघन करावे. त्यानंतर काही दिवस बीट, फळं व भाज्यांचे रस प्यावेत. दोन दिवसांनी संतुलित जेवण घ्यावे. कच्च्या शिजवलेल्या भाज्या, फळांचे रस यावर भर ठेवावा. थोड दही व एक चमचा सूर्यफूल तेल जेवणात मुद्दाम घ्यावे. रूग्णाने मांसाहार, प्रक्रियायुक्त पदार्थ (ब्रेड, केक, कॅडबरी, डबाबंद अन्न) टाळावे. तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ, मद्य, साखरेचे पदार्थ, कॉफी, लोणची टाळावीत. एकाचवेळी भरपेट जेऊ नये. सात्त्वि आहार घ्यावा. पित्तखडे जुनाट व आकाराने खूप मोठे असतील तर दुर्बिणशल्य चिकित्सा (लॅपरोस्कोपिक) ही सोपी शस्त्रक्रिया करून घ्यावी. अथवा अत्याधुनिक लेसरसदृश किरणाव्दारे हे खडे फोडून घ्यावे, या दोहोंमध्ये रूग्णांना सहसा जास्त त्रास होत नाही.

डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक -९९१६१०६८९६
सरनोबत क्लिनिक- ९९६४९४६९१८

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.