बेळगाव लाईव्ह : गेल्या दोन निवडणुकीत पराभवाचा सामना करत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने आगामी विधानसभा निवडणुकीत योग्य रणनीती ठरवून मराठी भाषिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार घेतला आहे.
आतापर्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून निवडणुकीच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल उमेदवार निवडीच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघाचा उमेदवारीसाठी प्रतिज्ञापत्र आणि विनंतीअर्ज सादर करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आतापर्यंत ‘दक्षिण’साठी वल्लभ गुणाजी, रतन मासेकर, मनोहर किणेकर, अप्पासाहेब गुरव, रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, रवी साळुंके आणि मदन बामणे अशा ८ जणांनी अर्ज सादर केले आहेत. तर ‘उत्तर’साठी शिवाजी मंडोळकर आणि अमर येळ्ळूरकर या दोघांनी अर्ज सादर केले आहेत. ‘ग्रामीण’साठी आर. एम. चौगुले आणि रामचंद्र मोदगेकर या दोघांनी निवड समितीकडे अर्ज सादर केले आहेत. अद्याप ग्रामीण मतदार संघात इच्छुक उमेदवारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी शुक्रवार पर्यंतचा वेळ आहे.
खानापूर मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी आतापर्यंत मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, विलास बेळगावकर, निरंजन सरदेसाई, रुक्मांना झुंजवाडकर, गोपाळराव पाटील आणि पांडुरंग सावंत अशा ७ जणांनी अनामत रक्कम आणि प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा निवड समितीने केलेल्या आवाहनानुसार वाढीव अनामत रक्कम आणि अंतिम प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत दिली होती. त्यानुसार गोपाळराव पाटील आणि पांडुरंग सावंत वगळता मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, विलास बेळगावकर, निरंजन सरदेसाई, रुक्मांना झुंजवाडकर या पाच जणांनी अंतिम प्रतिज्ञापत्र निवड समितीकडे सादर केले आहे. गेल्या १० वर्षात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यामध्ये, कार्यामध्ये सक्रिय सहभाग, सर्व थरातील बांधवांशी सलोख्याचे संबंध,उमेदवाराच्या
निवडणूक खर्चासंदर्भात तयारी, समितीच्या ध्येयधोरणाशी आणि सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी वचनबद्ध असणाऱ्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे. शिवाय निवड समिती इच्छुक उमेदवाराची मुलाखत देखील घेण्यात आहे. या सर्व निकषावर आधारित उमेदवाराची निवड करून येत्या २ दिवसात निवड समिती चर्चा करून अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात येणार आहे.