बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून राष्ट्रीय पक्षांनी उमेदवार जाहीर करण्यासाठी लगबग सुरु केली आहे. काँग्रेसने सर्वात आधीच उमेदवार जाहीर केले असून भारतीय जनता पक्षाने मंगळवारी पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र भाजपच्या पहिल्या यादीनंतर इच्छुकांचे आणि समर्थकांचे नाराजीसत्र सुरु झाले असून आगामी निवडणुकीत भाजपपुढे बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे.
बेळगाव ग्रामीण, उत्तर, दक्षिण आणि खानापूर मतदार संघात भाजपच्या निवडक उमेदवारांना उमेदवारी जाहीर होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच धक्कादायक पद्धतीने भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. यामुळे भाजपमध्ये नाराजीसत्र सुरु झाले. गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असणाऱ्या संजय पाटील यांना डावलून रमेश जारकीहोळी समर्थक आणि भाजपमध्ये नवखे असलेले नागेश मन्नोळकर यांना उमेदवारी देण्यात आली. उत्तर मतदार संघात विद्यमान आमदार अनिल बेनके यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच लिंगायत समाजाच्या मतांवर डोळा ठेवून डॉ. रवी पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर खानापूर मतदार संघात २०२३ सालची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप प्रवेश केलेले माजी आमदार अरविंद पाटील यांना डावलून मागील निवडणुकीत पराभूत झालेले विठ्ठल हलगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
भाजपच्या एकंदर उमेदवार यादीमुळे बेळगावमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले असून इच्छुकांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून याचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. आमदार अनिल बेनके समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना मोकळ्या करत बुधवारी राणी चन्नम्मा चौकात तासाहून अधिक काळ रास्ता रोको केले. भाजप उत्तर मधून अनिल बेनके यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली. यानंतर ग्रामीण मधून माजी आमदार संजय पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी जवळपास १०० हुन अधिक कार्यकर्त्यांनी विभाग कार्यालयात राजीनामा दिला. खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी आपल्या समर्थकांसह बैठक घेत या निवडणुकीसंदर्भात ठोस निर्णय घेण्याचा विडा उचलला आहे.
एकंदर हि सर्व परिस्थिती पाहता भाजपाला आगामी निवडणुकीत विरोधकांपेक्षा स्वपक्षातूनच बंडखोरीचे मोठे आव्हान आहे. डावलण्यात आलेल्या उमेदवारीमुळे अनेकांनी बंडखोर म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून आगामी निवडणुकीत भाजप बंडाळीला थोपविण्यात यशस्वी ठरेल कि निवडणुकीपेक्षा बंडखोरीचाच संघर्ष भाजपाला डोईजड ठरेल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.