भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे केंद्र बनलेल्या उप नोंदणी कार्यालयातील आठ ऑपरेटरची तडकाफडकी बदली करण्यात आली असून या कारवाईमुळे कार्यालयातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.काही दिवसांपूर्वी उप नोंदणी कार्यालयातून नोंद झालेले खरेदीपत्र चोरीला गेले होते त्यामुळे या कार्यालयातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार चव्हाट्यावर आला होता.खरेदीपत्र चोरीला जाण्यात ऑपरेटर्सचा हात असल्याचे उघडकीस आले आहे.
या ऑपरेटर्स मधील खाबूगिरी इतक्या पराकोटीला गेली की दुसऱ्या ऑपरेटरला अडचणीत आणण्यासाठी कागदपत्रे हरवणे,कागदपत्रे लपवून ठेवणे असे प्रकार ऑपरेटर करू लागले.
अर्थात यांच्या पाठीशी अधिकाऱ्यांचा वरदहस्त होताच.शेवटी खरेदीपत्र चोरी प्रकरण पोलिसात गेल्यामुळे उप नोंदणी कार्यालयाची उरलीसुरली अब्रू देखील गेली आहे.भ्रष्टाचाराने बोकळलेल्या उप नोंदणी कार्यालयात तुझी कमाई जास्त की माझी या ऑपरेटर मधील स्पर्धेमुळे कार्यालय आणि अधिकाऱ्यांची चांगलीच बदनामी झाली आहे.
कॉम्प्युटर ऑपरेटर हे एका खाजगी कंपनीचे कर्मचारी होते.आता येथे दुसऱ्या कंपनीच्या ऑपरेटर्सची नेमणूक करण्यात येणार आहे.दोन उप नोंदणी अधिकाऱ्यांपैकी एकाची बदली करण्यात येणार आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरेदीपत्र चोरी प्रकरण गांभीर्याने घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येत आहे.बेळगाव लाईव्हने सर्वप्रथम खरेदीपत्र चोरीची बातमी देऊन प्रकरण लावून धरले होते.
या ऑपरेटर्स बदली नंतर दोन्ही पैकी एक अधिकाऱ्यांवर देखील बदलीची टांगती तलवार निर्माण झाली आहे एकूणच सब रजिस्ट्रार कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.