महिपाळगड हा तसा निसर्गाने नटलेला आणि वनराईत वसलेला गड म्हणून ओळखला जातो. या परिसरात बेळगाव शहरातून तसेच इतर भागातून येणारे प्रेमीयुगल आणि निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्यावर नागरिक लक्ष ठेवून असणार आहेत. त्यामुळे यापुढे महिपाळगड परिसरात असे प्रकार चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे.
महिपाळगड परिसरात अवैध धंद्यांना ऊत आला होता. मद्यपी व तळीरामांनी तर अक्षरशः महिपाळगडचे सौंदर्य धोक्यात आणले होते. आता यापुढे असे प्रकार करणाऱ्यावर चांगलीच कारवाई होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांनी याबाबत लवकरच बैठक घेऊन तसा ठरावही करण्याचे ठरविले असून ही बैठक येत्या काही दिवसातच होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे यापुढे असे प्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा निश्चय ग्रामस्थांनी केल्याची माहिती मिळाली आहे.
महिपाळगड परिसरात पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरण अनुभवावयास मिळतो. याच निसर्गात आपली चैनी करावी या उद्देशाने काही मद्यपी व तळीराम मद्याच्या बाटल्या या परिसरात फेकून येथील निसर्ग सौंदर्य धोक्यात आणण्याचे काम करीत आहेत. मात्र यापुढे असे प्रकार घडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
येत्या दोन ते तीन दिवसात याबाबत ग्रामस्थ बैठकीत ठोस निर्णय घेणार आहेत. महिपाळगड हे महाराष्ट्र हद्दीत येत असले तरी कर्नाटक हद्दीत येणाऱ्या जंगल परिसरात अनेकांचा धुडगूस सुरू आहे. तसे पाहता ही जबाबदारी कर्नाटकी पोलिसांची असून त्यांनी मात्र हात झटकले आहेत. त्यामुळे निसर्गाची देण असलेल्या महिपाळगड वासियांनी स्वतः पुढाकार घेऊन असे गैरप्रकार करणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा लवकरच घेण्यात येणाऱ्या बैठकीत होणार आहे.