बेळगाव महानगरपालिकेची आणि महापौर संज्योत बांदेकर यांच्या कारकिर्दीची शेवटची सर्वसाधारण सभा उद्या होणार आहे, या सभेत सीमाप्रश्नाचा ठराव मांडणार का? या प्रश्नावर महापौर संज्योत बांदेकर यांनी आपले हात झटकले आहेत
सोमवारी त्यांच्याशी संपर्क साधला असता, संपूर्ण मराठी गट आणि मार्गदर्शक संभाजी पाटील जो निर्णय देतील त्यावर ठराव करायचा की नाही हे ठरवू असे त्या म्हणाल्या.
आपण मराठीसाठी काय केले नाही असा आरोप जनतेतून होत आहे याबद्दल विचारले असता, हा आरोप आपल्याला मान्य नाही. मराठी मधून परिपत्रके मिळावीत म्हणून आपण वैयक्तिकरित्या भरपूर पाठपुरावा केला आहे, असे त्या म्हणाल्या.
बैठक उद्या आहे, वेळ फार कमी आहे, ठराव मांडणार का, या प्रश्नाला त्यांनी टोलवले आणि निर्णयाचा चेंडू सर्व मराठी नगरसेवक, आमदार आणि सत्ताधारी गटाकडे फेकला आहे.
आरक्षणामुळे जर मराठी महापौर होत नसेल तर ठराव मांडा अशी मागणी जनतेतून होत असताना याबद्दल सत्ताधारी मराठी गटाने आपला निर्णयच घेतलेला नाही, अशा परिस्थितीत ठरावाचे भवितव्य अडकले आहे.