बेळगाव लाईव्ह :4 डिसेंबरपासून बेळगावातील सुवर्णविधानसौधा येथे हिवाळी अधिवेशन दहा दिवस चालणार आहे. गुरुवारी बेंगळूर मधे सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
नोव्हेंबर महिन्यामध्ये अधिवेशन होणार असल्याचे गृहीत धरून अधिकारी वर्गाने तयारी सुरू केली होती पण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणारे हे अधिवेशन या महिन्यातील कनकदास जयंती, बालदिन, आणि दिवाळी सुट्टी तसेच काही इतर कार्यक्रम या सर्वांचा आढावा घेतल्यानंतर हे अधिवेशन डिसेंबर महिन्यात घेण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे आता जसजसे दिवस जवळ येत आहेत तस तसा अधिवेशनाच्या तयारीने जोर धरला आहे.अधिकारी वर्गाने अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू केली आहे.
कर्नाटक सरकारच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक हितेंद्र सिंग येत्या शुक्रवारी 17 व शनिवारी 18 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच बेळगाव भेटीवर येत आहेत. यावेळी ते अधिवेशनाची तयारी आणि पोलीस आयुक्तालय कार्यालयाचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यामुळे सध्या बेळगाव पोलीस प्रशासनाकडून अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक हितेंद्र सिंह यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे.
त्या अनुषंगाने आज बुधवारी दिवसभर पोलीस आयुक्तालय कार्यालय परिसरात युद्धपातळीवर स्वच्छता आणि रंगरंगोटीची मोहीम राबविण्यात आली. आयुक्तालय कार्यालय आवारात अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी खराट्याने झाडलोट करून आवार स्वच्छ झळझळीत करण्याच्या कामात व्यस्त असलेले पाहावयास मिळत होते. त्याचप्रमाणे कांही पोलीस कर्मचारी बगीचा व हिरवळीची स्वच्छता आणि रंगरंगोटीमध्ये गुंतले होते.
तसेच 4 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान बेळगावातील सर्व हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत. आमदार आणि सरकारी अधिकाऱ्यांचीसोय हॉटेल्स आणि सभागृहामध्ये करण्यात येणार आहे.
अधिवेशनाला येणाऱ्या मान्यवरांना, बेंगळुरूहून येणाऱ्या पत्रकारांना भोजन, निवास, वाहन यासह सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचे काम जोरात सुरू आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, कुणालाही कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. अधिवेशनाच्या तयारीसाठी जवळपास सर्वच विभागाचे अधिकारी मैदानात उतरले आहेत.
सुवर्णविधानसौधच्या प्रांगणात अधिवेशनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. स्वच्छतेची कामे करण्यात आली आहेत. सुवर्ण विधानसौधच्या समोरच्या बागेत आणखी फुलझाडे लावण्यात येत असून इमारतीचे सुशोभीकरणही करण्यात येत आहे. तसेच आंदोलकांसाठीही जागेची व्यवस्था करण्यात आली आले.
कर्नाटक- महाराष्ट्र सीमा प्रश्नाच्या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव घरावर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकार हे हिवाळी अधिवेशन दर वर्षी बेळगावमध्ये भरवत आले आहे.
यासाठी 4-10 डिसेंबरपर्यंत शहरातील सर्व हॉटेल्स, सभागृहे बुक करण्यात आली आहेत. सर्व आमदार आणि सरकारी अधिकाऱ्यांची सोय हॉटेल आणि सभागृहांतून करण्यात येणार आहे.