बेळगाव लाईव्ह :राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगाव जिल्ह्याचा प्रदेश इतका विशाल आहे की त्यामध्ये तीन जिल्हे होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे अशी गेल्या तीन दशकांपासूनची मागणी आहे. तथापि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि मतभिन्नता यामुळे बेळगाव जिल्हा विभाजनाचे स्वप्न हे आजपर्यंत स्वप्नच राहिले आहे. मात्र आता आमदार लक्ष्मण सवदी यांच्या वक्तव्यामुळे जिल्हा विभाजनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
बेळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ 13415 चौ. कि.मी. इतके असून लोकसंख्या 50 लाखापेक्षा अधिक आहे. जिल्ह्याच्या व्याप्तीत 18 विधानसभा आणि 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्याचप्रमाणे या जिल्ह्यामध्ये 15 तालुके, 6 आरटीआय कार्यालयं, 506 ग्रामपंचायती, 345 तालुका पंचायत सदस्य आणि 90 जिल्हा पंचायत सदस्य आहेत.
जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये बेळगाव, गोकाक, हुक्केरी, बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग, अथणी, चिक्कोडी, रायबाग, खानापूर, कित्तूर, कागवाड, निपाणी आणि मुडलगी यांचा समावेश आहे. बेळगाव जिल्हा विभाजनाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे चिक्कोडी उपविभागामधील अनेक गावांतील लोकांना त्यांच्या सरकारी कामासाठी बेळगावला यावे लागते. त्यासाठी त्यांना सुमारे 200 कि.मी. पेक्षा जास्त अंतराचा प्रवास करावा लागतो.
त्यामुळे एखादे साधे सरकारी काम पूर्ण करून घेण्यासाठी त्यांना संपूर्ण एक दिवस आपले कामधंदे सोडून बसावे लागते, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे जनतेची गैरसोय दूर व्हावी आणि प्रशासकीय दृष्ट्या देखील अनुकूल व्हावे यासाठीच बेळगाव जिल्ह्याचे विभाजन केले जावे अशी मागणी गेल्या तीन दशकांपासून केली जात आहे. मात्र फक्त निवडणूक आणि अधिवेशन काळातच जिल्हा विभाजनाची चर्चा होत असते. हा काळ सोडला तर उर्वरित काळात एकही राजकारणी जिल्हा विभाजनाबाबत एक शब्दही बोलत नाही.
आपला पक्ष सत्तेवर आल्यामुळे अलिकडे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिक्कोडी आणि गोकाक अशा दोन जिल्ह्यांची निर्मिती केली जाईल, असे म्हंटले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आमदारांची बैठकही झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र जिल्हा पालकमंत्र्यांच्या वक्तव्याविरोधात प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी मुख्यमंत्र्यांच्या त्या बैठकीला मी गेलो नाही असे स्पष्ट करून जिल्हा विभाजनामुळे आमच्या बैलहोंगल तालुक्यावर अन्याय होणार असल्याचे म्हंटले आहे. अथणी, रायबाग, कागवाड, कुडची आणि बागलकोट जिल्ह्यातील तेरदाळ व जमखंडी यांचा एकत्रित असा अथणी जिल्हा झाला पाहिजे. त्यामुळे या भागाला शाश्वत निधी मिळू शकेल. या संदर्भात सहा मतदार संघाच्या आमदारांचे मत येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल, असे आमदार लक्ष्मण सवदी यांनी सांगितले.
दरम्यान बेळगाव जिल्हा स्वतःच्या अधिपत्याखाली ठेवण्यासाठी जारकीहोळी, सवदी, कत्ती, कोरे आणि जोल्ये या परिवारांमधील अंतर्गत चढाओढीमुळेच बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होऊ शकलेले नाही, असेही बोलले जात आहे. दोन महिन्यापूर्वी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री हेब्बाळकर यांच्यासह कांही आमदारांनी बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासाठी काँग्रेस सरकारवर दबाव आणला होता. जिल्हा विभाजनासंदर्भात मुख्यमंत्री आणि सरकार लवकरच निर्णय घेईल.
तोपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे, असे पालकमंत्री जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे बेळगावचा सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत बेळगाव जिल्हा विभाजनाच्या मुद्द्याला हात घालू नये, अशी मागणी कन्नड आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे केली आहे. एकंदर यावेळी तरी बेळगावातील हिवाळी अधिवेशनात आमदार मंडळी जिल्हा विभाजना संदर्भात आवाज उठवतात का? ते पहावे लागेल.