बेळगाव लाईव्ह:नगरसेवकाला मारहाण झाल्या प्रकरणी केलेल्या पोलीस कारवाईमागे कोणत्याही प्रकारचे राजकारण किंवा राजकीय दबाव नाही. टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी कायद्याच्या चौकटीत निष:पक्षपातीपणे या प्रकरणाची चौकशी केली असून दोघांवरही कारवाई केली आहे, असे पोलीस आयुक्त एस. एन सिद्धरामप्पा यांनी स्पष्ट केले
बेळगाव पोलीस आयुक्तालयामध्ये आज सोमवारी सकाळी भाजपचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. टॉवरच्या उभारणीवरून रमेश पाटील आणि नगरसेवक अभिजीत जवळकर या दोघांच्यात वादावादी होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले होते. या घटनेसंदर्भात कारवाई करताना कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता पोलीस अधिकाऱ्यांनी नि:पक्षपातीपणे संपूर्ण चौकशी केली आहे.
सदर चौकशी अंतीच उभयतांवर कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. यावेळी रमेश पाटील यांच्या विरुद्धची तक्रार खोटी आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना फिर्याद खरी आहे की खोटी? हे मी आत्ताच सांगू शकत नाही. मात्र याप्रकरणी दोघांच्याही बाजूने सर्वांगाने चौकशी केली जात आहे. या चौकशी अंतीच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
दरम्यान, भाग्यनगर येथील प्रभाग क्र. 42 चे नगरसेवक अभिजीत जवळकर यांना अटक केल्याच्या निषेधार्थ भाजप नेत्यांनी आज पोलीस आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन केले. महापौर शोभा सोमनाचे यांच्यासह भाजपचे माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
मारहाणीच्या प्रकरणात सर्वप्रथम अभिजीत जवळकर यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी रमेश पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची कारागृहात रवानगी केली. त्यानंतर रमेश पाटील यांच्या पत्नीने टिळकवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यामुळे पोलिसांनी नगरसेवक अभिजीत जवळकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांनाही कारागृहात धाडले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी पत्रकारांना दिली. एकंदर टॉवर उभारणीवरून गेल्या 23 नोव्हेंबर रोजी नगरसेवक अभिजीत जवळकर व रमेश पाटील यांच्यात झालेल्या हाणामारीच्या प्रकरणाची आपण नि:पक्षपणे चौकशी करणार असल्याचे स्पष्टीकरण पोलीस आयुक्तांनी दिले.
खडेबाजार उपविभागाचे एसीपी आणि पोलीस निरीक्षक या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. तसेच नगरसेवक जवळकर यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतरच काल दुपारी 12:30 वाजता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. गरज भासल्यास या प्रकरणी विशेष तपास अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, अन्यथा खडेबाजार एसीपी व पोलीस निरीक्षकांच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल, अशी माहितीही पोलीस आयुक्त एस. एन सिद्धरामप्पा यांनी दिली.