निवडणुकीचे कारण पुढे करून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शहरातील प्रभागांमधील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. याबद्दल मराठी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून प्रभाग स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.
शहरातील कांही प्रभागांमध्ये स्वच्छतेकडे महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे संबंधित प्रभागातील स्वच्छता दिवसेंदिवस वाढत आहे. अपुऱ्या सफाई कामगारामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. या संदर्भात स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकासह संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही आहे.
तक्रार करण्यास गेलेल्या नगरसेवकांना सध्या आम्हाला निवडणुकीचे काम लागले आहे, ते काम महत्त्वाचे आहे असे सांगून अधिकाऱ्यांकडून तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला जात आहे. त्यामुळे नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर नगरसेविका वैशाली भातकांडे, सिद्धार्थ भातकांडे आदींनी शेवटी आज बुधवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील यांची भेट घेतली.
सदर भेटीप्रसंगी नगरसेवकांनी प्रभाग स्वच्छता, पाणीपुरवठा या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील अस्वच्छतेची समस्या सांगून महापालिका अधिकारी व कर्मचारी कशाप्रकारे आपली जबाबदारी टाळत आहेत याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
तसेच प्रभागातील सफाई कामगारांची संख्या वाढवण्याबरोबरच प्रभाग स्वच्छतेचे काम तात्काळ हाती घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावेत अशी विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.