Wednesday, January 15, 2025

/

सवदींचा काँग्रेस प्रवेश म्हणजे परस्पर फायदेशीर व्यवस्था?

 belgaum

माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सवदी यांनी काल शुक्रवारी काँग्रेस पक्षांमध्ये केलेला प्रवेश म्हणजे परस्पर फायदेशीर व्यवस्था वाटत आहे. काँग्रेस प्रवेशामुळे सवदी यांना अथणी मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. याउलट गणीग लिंगायत नेते असलेल्या सवदी यांच्या प्रचाराचा आपल्याला कर्नाटक वायव्य आणि ईशान्य भागात फायदा मिळेल अशी काँग्रेसला आशा आहे.

महत्त्वाचे म्हणजे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कर्नाटकात काँग्रेसचे पुनर्रसंघटन केले जाऊ शकते. या खेरीज या क्षेत्रावरील सतीश जारकीहोळी यांचे प्रभुत्व कमी करण्यास आणि दुसरा ज्येष्ठ नेता तयार करण्यास काँग्रेसला मदत मिळणार आहे. एकंदर महेश कुमठळी यांनी काँग्रेस मधून भाजपमध्ये पक्षांतर केल्यामुळे अथणी मतदारसंघातून विस्थापित झालेले 63 वर्षीय लक्ष्मण सवदी पुन्हा आपल्या मूळ मतदार संघात आपले पाय रोवण्यासाठी सिद्ध झाले आहेत.

अथणी येथील लिंगायत मठाच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या आपल्या समर्थकांच्या भव्य मेळाव्यामध्ये बोलताना सवदी यांनी प्रदीर्घकाळ मी अपमान सहन केला असल्यामुळे भाजपला सोडत आहे. ज्या पद्धतीने भाजपने मला बाजूला सारले ते अतिशय क्लेशदायक होते असे सांगितले. त्यांच्या या निर्णयाचे समर्थकांनी स्वागत केले असून कुमठळ्ळी यांना अथणीमधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्ट होताच सवदींनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असे एका भाजप नेत्याने सांगितले.

साधारण वर्षभरापूर्वी जेंव्हा भाजप आमदारांनी निधर्मी जनता दलाच्या बाजूने मतदान केले, तेंव्हापासून हे सर्व सुरू झाले होते. तथापि लक्ष्मण सवदी यांच्या मते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेस आमदारांना मतदान टाळण्यास सांगून त्यांच्या विजयास हातभार लावला. आपण समजतो तसे भाजप हाय कमांड आपल्या पाठीशी नाही असे त्यावेळी सवदी यांना वाटत होते असेही त्या भाजप नेत्याने सांगितले. जेव्हा 2019 मध्ये रमेश जारकी होळी आणि त्यांचे समर्थक कुमठळ्ळी हे उभयता अथणीतील राजकीय पटलावर आले.Savadi

तेंव्हापासून पक्ष संघटनेत दुफळी पडून दोन गट निर्माण झाले. जारकीहोळी बंधूंनी पक्षाला एखाद्या खाजगी संघटनेप्रमाणे चालविण्यास सुरुवात केली. रमेश जारकीहोळी यांचा अथणीमधील हस्तक्षेप वाढू लागला आणि ते अथणीतील पक्ष कार्यालय आणि सरकारी कार्यालयांमध्ये आपल्या निष्ठावंतांची नेमणूक करू लागले. या प्रकारामुळे सवदी समर्थकांमध्ये क्षोभ निर्माण झाला अशी माहिती अथणी नगरपालिकेच्या एका सदस्याने दिली.

एकंदर परिस्थिती पाहता आपल्या मुलांमध्ये आपला राजकीय वारसा भविष्यात कायम राहील की नाही? याबाबत सवदींना चिंता लागून राहिली होती. जर भाजपने आणखी एक किंवा दोन वेळा आपली उमेदवारी कुमठळ्ळी यांनाच दिली तर सवदींचे अथणी मधील अस्तित्व पूर्णपणे संपले असते. यासाठीच त्यांनी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला, असे लक्ष्मण सवदी यांच्या एका निष्ठावंत भाजप कार्यकर्त्याने सांगितले. सध्या लक्ष्मण सवदी यांच्या लोकप्रियतेमुळे उत्तर कर्नाटकातील गणीग लिंगायत मतदार आपल्याकडे वळतील अशी काँग्रेस नेत्यांना आशा आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.