निवडणूक विभाग गेल्या अनेक निवडणुकांमध्ये दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि कोरोना बाधितांसाठी पोस्टल मतदानाचा पर्याय उपलब्ध करून देत आहे. याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीची जबाबदारी असलेल्या पत्रकारांसाठी टपाली मतदानाची मुभा देण्याचा विचार सुरू असून लवकरच त्याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.
शहरी भागात नोकरी आणि मूळगावी मतदार यादीत पत्रकारांची नावे असल्यामुळे बऱ्याच पत्रकारांना निवडणुकीत मतदानापासून वंचित रहावे लागते. त्यासाठी यावेळी पहिल्यांदाच पत्रकारांबाबत विचार करण्यात आला आहे.
पत्रकार ज्या ठिकाणी सेवा बजावतात तेथूनच त्यांना मतदान करता यावे या उद्देशाने टपाली मतदानाचा पर्याय देण्याबाबतचे नियोजन सुरू आहे. या अनुषंगाने माहिती आणि प्रसिद्धी खात्याला याबाबत प्राथमिक सूचना आल्या असून निवडणुकीची जबाबदारी असलेल्या पत्रकारांची संख्या किती आहे याची विचारणा करण्यात आली आहे.
सध्या प्रसार माध्यमांना निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात येणाऱ्या पत्रकारांची यादी देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार पत्रकारांचे नांव, संपर्क क्रमांक आणि पाच फोटो हे आज 10 एप्रिलपर्यंत माहिती व प्रसिद्धी खात्याच्या कार्यालयात सादर करण्याचा आदेश आहे.
या आधारे निवडणुकीची जबाबदारी असलेल्या पत्रकारांची माहिती मिळणार आहे. त्याप्रमाणे टपाली मतदानाचा पर्याय पत्रकारांना मिळणार आहे. एकंदर यंदाच्या निवडणुकीत पत्रकारांना टपाली मतदानाचा पर्याय मिळण्याची दाट शक्यता आहे.