बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय पक्षांनी उमेदवारीचे केलेले राजकारण पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला स्वतःचे आमदार निवडून आणण्याची संधी मिळाली आहे. मात्र अद्याप महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांची निवड निश्चित झाली नसून यासाठी निवड समिती विविध निकषावर आधारित उमेदवारांची निवड करत आहे.
उत्तर मतदार संघाच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी मागील आठवड्यापासून निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. वैयक्तिकरित्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सीमाप्रश्नाची बांधिलकी आणि समितीशी असलेली एकनिष्ठता यावर आधारित उमेदवारांच्या निवडीचा निकष लावण्यात येत आहे. उमेदवार निवड कमिटीसह जनतेच्या मतांचा आढावा घेण्यासाठी जनमत चाचणी देखील विचार करण्यात आला असून आता गुप्त मतदानाद्वारे उमेदवारांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
उत्तर मतदार संघासाठी ऍड. अमर येळ्ळूरकर आणि नगरसेवक शिवाजी मंडोळकर या दोघांनी उमेदवारीसाठी विनंतीअर्ज केला आहे. समितीच्या इतिहासात एक वेगळा ठसा उमटेल या अनुषंगाने एकाने समजूतदारीने माघार घेऊन समेट घडविण्याची विनंती निवड कमिटीने केली होती.
मात्र दोन्ही इच्छुकांनी निवड चाचणीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविल्याने निवड कमिटी तयारीला लागली आहे. दोन्ही उमेदवारांपैकी एकाची निवड करण्यासाठी निवड कमिटी गुप्त मतदान करणार असल्याचे सांगण्यात येत असून अशा मतदानाला जनतेतून विरोध होत आहे. निवड प्रकिया पारदर्शकरीत्या पार पडावी अशी इच्छा जनतेतून व्यक्त होत आहे.
२००८ साली अस्तित्वात आलेल्या उत्तर मतदार संघाच्या निवडणुकीपासून जनमत चाचणीचा घेण्यात येत असून किरण सायनाक, संभाजी पाटील आणि प्रकाश मरगाळे यांच्यासाठीही जनमत चाचणीचाच अवलंब करण्यात आला होता. या तिन्ही वेळी गुप्त मतदान प्रक्रिया अवलंबिण्यात आली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीतदेखील जनमत घेऊन उमेदवाराची निवड करण्यात यावी, अशी तीव्र लोकेच्छा व्यक्त होत आहे.