म. ए. समितीने ग्रामीण मतदारसंघात नव्या चेहर्याला संधी दिली असल्यामुळे आणि गेल्या पंधरा वर्षांपासून मराठी भाषिक हक्काच्या आमदारापासून वंचित असल्यामुळे यावेळी समितीच्या विजयासाठी अधिक प्रयत्न करण्याचा आणि प्रचार यंत्रणा आक्रमक राबवण्याचा निर्धार तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्या बैठकीत झाला.
कॉलेज रोड येथील तालुका म. ए. समिती कार्यालयात गुरुवारी युवा आघाडी आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रचारासंदर्भात महत्वाची बैठक झाली.
यावेळी संपूर्ण मतदारसंघात समिती उमेदवार आर. एम. चौगुले यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीत समितीचा आमदार करण्याचा निर्धार जनतेतून झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता प्रचाराच्या महत्वाच्या टप्प्यावर प्रचार यंत्रणा अधिक आक्रमक राबवणे आणि मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रातील महत्वाचे नेते काही दिवसांत प्रचारासाठी येणार आहेत. त्यामुळे या महत्वाच्या काळात अधिक जोमाने प्रचार करणे, त्यांच्या प्रचारफेरी आणि सभांचे नियोजन याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष दत्ता उघाडे, राजू किणयेकर, बाबाजी देसूरकर, मल्लाप्पा पाटील, महादेव गुरव, केदारी कणबरकर, अनिल हेगडे, अंकुश पाटील, महेश जुवेकर, नागेंद्र गवंडी, अनिल पाटील आदी उपस्थित होते.
एकीमुळे बळ वाढले
तालुका म. ए. समितीत एकी झाल्यापासून चांगले वातावरण निर्माण झाले. त्यामुळे यावेळी एकच उमेदवार उभा ठाकला असून प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. मराठी जनता म. ए. समितीच्याच पाठीशी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रचारात कोणतीही कसर न सोडता, तो अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.