बेळगाव शहरांमध्ये येत्या शनिवार दि. 22 एप्रिल रोजी श्री शिवजयंती आणि सोमवार दि. 24 एप्रिल रोजी श्री शिवजयंती मिरवणूक साजरी करण्यासंदर्भात मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ बेळगावतर्फे बेळगाव शहर पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
दरवर्षी पारंपारिकरित्या आम्ही वैशाख द्वितीयेला शिवजयंती साजरी करतो, जी येत्या 22 एप्रिल रोजी आहे. त्यादिवशी आम्ही पूजा विधी करून पुढे तीन दिवसांनी मिरवणूक काढतो म्हणजे यंदा तो दिवस 24 एप्रिल हा आहे. शिवजयंती दिवशी 22 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजता शहरातील नरगुंदकर भावे चौक येथे आणि सकाळी 10 वाजता शिवाजी उद्यान शहापूर पूजा विधी होईल. या पद्धतीने शहरातील शिवजयंती मंडळे आपापल्या भागात शिवजयंती साजरी करतील. आम्ही सर्व मंडळांना संबंधित पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन शिवजयंती कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना केली आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे 24 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता नरगुंदकर भावे चौक येथून शिवजयंती मिरवणुकीला प्रारंभ होईल. मिरवणुकीचा मार्ग पुढील प्रमाणे असणार आहे. नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, हेमुकलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर रोड मार्गे श्री कपिलेश्वर मंदिर येथे सांगता. तरी संबंधित दिवशी आपल्या खात्याकडून आवश्यक सर्व व्यवस्था केली जावी ही विनंती, अशा आशयाचा तपशील बेळगाव शहर पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ बेळगावचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन सादर करण्यात आले आहे.