Sunday, December 1, 2024

/

उष्म्यात वाढ; मात्र ढगाळ वातावरणामुळे थोडा दिलासा

 belgaum

अलीकडे गेल्या चार दिवसात बेळगाव शहरातील उष्म्यामध्ये कमालीची वाढ होऊन काल गुरुवारी पारा 39.5 अंश सेल्सिअसवर पोहचला होता. मात्र आज शुक्रवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शिडकाव्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना थोडा दिलासा मिळाला

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमध्ये यंदा प्रथमच अधिक तापमानाची नोंद होत आहे. सर्वसामान्यपणे मे महिन्यात जाणवणारी सूर्याची दाहकता यावेळी एप्रिल महिन्यातच जाणवू लागली आहे गेल्या 2016 नंतर यंदा प्रथमच बेळगाव जिल्ह्याचा पारा एप्रिलमध्ये चाळीशी जवळ पोहोचला आहे.

परिणामी गेले तीन-चार दिवस अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्म्याने शहरवासीय हैराण झाले आहेत. शहर परिसरात गेल्या मंगळवारी 38.6 अंश सेल्सिअस बुधवारी 39.3 अंश सेल्सिअस आणि काल गुरुवारी 39.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. कालचा गुरुवारचा दिवस तर यंदाच्या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस ठरला.

आज शुक्रवारी दुपारनंतर मात्र ढगाळ वातावरणासह पावसाच्या शिडकाव्यास सुरुवात झाल्यामुळे वातावरणात थोडी शीतलता आली आणि नागरिकांना दिलासा मिळाला.

दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळ्याला सुरुवात होते. तत्पूर्वी दोन महिने अगोदरच अवकाळी पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर उष्णतेची तीव्रता देखील कमी होते.

मात्र यंदा क्वचितच वळीवाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे उष्मा कमी झालेला नाही. शहर परिसरातील उष्णतेत अजूनही वाढ होण्याची आणि 2016 मधील 40 अंश सेल्सिअसचा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.