विकास कामांमध्ये भ्रष्टाचार करून जनतेच्या पैशाची लूट करण्यात सोकावलेल्या अधिकारी आणि कंत्राटदाराने आपल्या मनमानीचा कहर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात गटारीचे सांडपाणी शेतात शिरून सुपीक शेत जमिनीचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्रकार शहरातील बी. एस. येडीयुरप्पा मार्गाच्या ठिकाणी घडला असून प्रशासनाने आपल्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे.
शहरातील बी. एस. येडीयुरप्पा मार्ग अलीकडच्या काळात तयार करण्यात आला असला तरी या मार्गावरील विकास कमी अद्यापही सुरूच आहेत. सदर रस्त्याची एक बाजू पावसाळ्यात गटार आणि ड्रेनेच्या सांडपाण्यामुळे पाण्याखाली जाते हे केल्या दोन-तीन वर्षात सर्वश्रुत झाले आहे.
ही समस्या येत्या पावसाळ्यात उद्भवू नये यासाठी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र हे करण्याऐवजी बी. एस. येडीयुरप्पा मार्गावरील एका बाजूची गटार दुरुस्तीच्या नावाने फोडून सांडपाणी थेट शेजारील शेतवाडीत सोडून देण्यात आले आहे. सदर प्रकार करण्यापूर्वी संबंधित शेतमालकाला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही किंवा त्याची परवानगीही घेण्यात आलेली नाही. सध्या मोठ्या प्रमाणात सांडपाणी शेतात शिरल्यामुळे सुपीक शेत जमिनीचे नुकसान होत आहे.
सदर शेतजमीन प्रभाकर रावजी या शेतकऱ्याने कसण्यासाठी घेतली आहे. बेळगाव लाईव्हशी बोलताना रावजी यांनी गटारीचे सांडपाणी शेत जमिनीत वळविण्याच्या या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. महिनाभरापूर्वी गटार दुरुस्तीच्या नावाने आमच्या शेताला लागून असलेली गटार फोडण्यात आली आहे. मात्र गटारीची दुरुस्ती करण्याऐवजी बांधकामामधील लोखंड लंपास करून गटाऱ्याचे सांडपाणी आमच्या शेतात वळविण्यात आले आहे.
सध्या शेतात मोठ्या प्रमाणात सांडपाणी केरकचरा घाण साचली असून याला जबाबदार कोण? सदर समस्येसंदर्भात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी मंजुश्री यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात आली आहे. मात्र अद्यापही त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही असे सांगून फोडण्यात आलेल्या गटाराची तात्काळ दुरुस्ती करण्याबरोबरच प्रशासनाने आपल्या शेतजमिनीची साफसफाई करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी प्रभाकर रावजी यांनी केली आहे.