मागील कांही महिन्यांमध्ये एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसल्यामुळे तसेच सक्रिय रुग्णही नसल्यामुळे बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याने गेल्या फेब्रुवारी महिन्यात आपला जिल्हा संपूर्णपणे कोरोना मुक्त झाल्याचे घोषित केले होते. मात्र शनिवारी अचानक पुन्हा मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेळगाव जिल्ह्यात गेल्या शनिवारी एका दिवसात 19 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 15 जण निपाणी आणि चिक्कोडी या सीमेवरील तालुक्यांमध्ये आढळून आले असून दोघे बेळगाव शहरातील आहेत, तर प्रत्येकी एक रुग्ण रायबाग आणि सौंदत्ती तालुक्यातील आहे.
राज्यात शनिवारी आढळून आलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये बेंगलोर शहर (165 रुग्ण) आणि शिमोगा (50 रुग्ण) यांच्या मागोमाग बेळगाव जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर होता. आरोग्य खात्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 19 पैकी 15 रुग्ण निपाणी आणि चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ, कोगनोळी, सौंदलगा, मांगुर, जैनापुर आणि इंगळी या गावांमध्ये सापडले आहेत. या पद्धतीने अचानकपणे मोठ्या संख्येने कोरोना बाधित आढळून आल्यामुळे सतर्क झालेल्या आरोग्य खात्याने आवश्यक क्रम हाती घेतले असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित रुग्णांचे घरगुती विलगीकरण केले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महांतेश कोणी यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या शनिवारी आढळून आलेल्या 19 कोरोना बाधित रुग्णांपैकी 16 रुग्ण हे महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटकातील गावांमधील आहेत.
आढळलेल्या रुग्णांचे घरगुती विलगीकरण करून आम्ही त्यांच्यावर तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांवर कडक नजर ठेवली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून आपल्या सीमावर्ती गावात मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांवर बारीक नजर ठेवण्याची सूचना मी स्थानिक प्रशासनांना केली आहे.
कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्यामुळे काल रविवारपासून आम्ही जिल्हाभरातील कोरोना चाचण्यांमध्ये दुपटीने वाढ केली आहे. येत्या काळात परिस्थिती परिणामकारकरीत्या हाताळण्याबरोबरच आवश्यक अन्य गोष्टींसह कोरोना प्रतिबंधक लस आणि फेसमास्क अधिक प्रमाणात उपलब्ध करण्याची मागणी मी यापूर्वीच केली आहे असे सांगून सध्या तरी परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणाखाली असून घाबरण्याचे कारण नाही असे डॉ. कोणी यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी नागरिकांनी स्वतःचे हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या जागी जाणे टाळणे, सार्वजनिक ठिकाणी फेस मास्कचा वापर करणे आदी खबरदारीच्या उपायांची अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.